मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) कारभाराचा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना फटका बसला. विद्यापीठाने ऐन परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी काही वेळ धावत दुसरे केंद्र गाठावे लागले. त्यातून विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या तृतीय वर्ष बीए अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना या परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यापीठाने १८ आणि १९ मार्चला दिले होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना एल्फिन्स्टन कॉलेज हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी ऑयडॉलकडून परीक्षा केंद्र बदलल्याचे संदेश मोबाइलवर विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले.
तर सुधारीत प्रवेशपत्र काढून घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलल्याचे संदेश पाहिले नाहीत. त्यातून विद्यार्थी एल्फिस्टन कॉलेजमध्ये पोहोचले. मात्र तिथे गेल्यावर परीक्षा केंद्र बदलल्याचे समजताच विद्यार्थ्यांना धावत विल्सन कॉलेज येथील नव्या केंद्रावर पोहचावे लागले. त्यातून काही विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचण्यास सुमारे अर्ध्या तासाचा विलंब झाला, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.
तसेच ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थी गोंधळले होते. अनेकांकडून संदेश पाहिले जात नाहीत. त्यातून त्यांना परीक्षा केंद्र समजले नाही. विद्यापीठाने आधीच योग्य नियोजन करायला हवे होते, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एल्फिन्स्टन कॉलेज अन्य विद्यापीठाच्या अखत्यारित गेले आहे. त्यामुळे हे केंद्र बदलावे लागले. त्याचे संदेश विद्यार्थ्यांना आदल्या रात्री पाठवण्यात आले होते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.
परीक्षा केंद्रावर दुसऱ्याच पेपरची नोटीस
विद्यापीठातील परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रावरील पेपरऐवजी दुसऱ्याच पेपरची नोटीस लावल्याचा प्रकार घडला. तृतीय वर्ष कला शाखेच्या एका विद्यार्थ्याचा मंगळवारी राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. मात्र त्या विद्यार्थ्याच्या परीक्षा कक्षातील बाकावर समाजशास्त्र विषयाची नोंद करण्यात आली होती. मात्र समाजशास्त्र विषयाचा अभ्यास केला नसल्याने ऐनवेळी हा पेपर कसा द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्याला पडला होता. त्यातून पेपरचा हा गोंधळ दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठातील शंकरराव चव्हाण कॉम्लेक्स ते आयडॉलचे केंद्र येथे विद्यार्थ्याला चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर विद्यापीठाने चूक दुरुस्त करून १५ मिनिटे उशिरा पेपर दिला, अशी माहिती विद्यार्थ्याने दिली. विद्यापीठाने ऐन परीक्षेवेळी हा गोंधळ घातल्याने अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. आता परीक्षा देऊ शकणार की नाही हा प्रश्न होता. परीक्षा केंद्रावरील अधिकारीही स्पष्टपणे काही सांगत नव्हते. त्यातून अडचणीत भरच पडली, असेही या विद्यार्थ्याने नमूद केले.
विद्यापीठाकडून परीक्षेआधीच परीक्षा केंद्राबाबत नियोजन करायला हवे. विद्यार्थ्याला प्रवेशपत्र दिल्यावर त्यात बदल करू नये. एखाद्या विद्यार्थ्याला संदेश न मिळाल्यास तो परीक्षेपासून वंचित राहू शकतो. याची जबाबदारी विद्यापीठ उचलेल का?
– संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य