राज्यात एप्रिल अखेरपर्यत तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) घेण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे टेट परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.
पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक भरतीबाबत लक्षवेधी मांडली होती. यावर दिपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे ध्येय असून, एप्रिल अखेरपर्यंत तीस हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली. केसरकर म्हणाले, ‘शिक्षकभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.
ही प्रक्रिया एप्रिल अखेर पूर्ण करण्यात येईल. या पदभरतीमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. या पदभरतीमध्ये कला विषयाच्या पदांचा समावेश नाही. हे शिक्षक ‘समग्र शिक्षा अभियाना’मधून भरण्याची कायद्यात तरतूद आहे.
त्यानुसार भरतीची कार्यवाही करण्यात येईल.’ राज्य सरकारने नेमलेल्या एजन्सीच्या माध्यमातूनच कला शिक्षक घेतले जातील, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
सेवानिवृत्त सैनिकांच्या माध्यमातून शिक्षण
राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयांचे शिक्षण देण्यासाठी सेवानिवृत्त सैनिकांना शिक्षण खात्यात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आगामी काळात बीपीएड पदवीधर आणि सेवानिवृत्त सैनिक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शारीरिक शिक्षण देता येईल, असेही दिपक केसरकर यांनी सांगितले.