राजस्थानमध्ये जन्मलेल्या स्वाती यांचे शिक्षण अजमेरमध्ये झाले. मुलीने डॉक्टर व्हावे अशी आईची इच्छा होती. त्यांची एक चुलत बहीण अधिकारी झाली होती. ती अधिकारी बहीण स्वातीच्या वडिलांना भेटायला आल्यावर तिचे वडील खूप आनंदी दिसत होते. त्यानंतर स्वातीने वडिलांकडे यूपीएससीबद्दल चौकशी केली आणि अधिकारी होण्याचे ठरवले.
लहानपणीच स्वातीने यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले होते. तेव्हापासून वडिलांनीही तिला खूप पाठिंबा दिला. स्वातीची आई पेट्रोल पंप चालवायची तर वडिलांनी स्वातीकडून यूपीएससीची तयारी करुन घेतली.
२००७ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत स्वाती यांनी ऑल इंडिया २६० रँक मिळवला तेव्हा वडिलांच्या मनात आपल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना होती. स्वाती त्या बॅचच्या सर्वात तरुण आयएएस होत्या. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मध्य प्रदेश कॅडर मिळाली.
नोकरीच्या काळात स्वाती यांची प्रतिमा दबंग अधिकारी अशी राहिली आहे. स्वाती मध्य प्रदेशातील मंडला येथे तैनात असताना खाण माफियांचा तेथे मोठा पगडा होता. स्वाती तिथे पोहोचल्यावर त्यांनी या खाण माफियांविरोधात मोहीम उघडली.
स्वाती कलेक्टर म्हणून मंडलाला येथे पोहोचल्या तेव्हा खाण माफियांबद्दल अनेक विभागांकडून तक्रारी येत होत्या. त्याआधारेच त्यांनी कारवाई केली. त्याचप्रमाणे त्यांचा खांडव्यातील कार्यकाळही अत्यंत आव्हानात्मक होता. मारल्या गेलेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या परिसरात पोहोचल्यावर हल्लेखोरांनी वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनासह स्वाती मीना यांनी हे आव्हानात्मक काम सहज पार पाडले.