नलरात्रीचे व्रत कसे आचरावे?
नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रातील ठराविक दिवशी व्रताचरण करावे, म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे, असे म्हटले जाते. व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे. केवळ फलाहारावर भर द्यावा. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा. व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही, असे सांगितले जाते.
‘या’ गोष्टींचे भान ठेवा
नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्म मुहुर्तावर उठावे. अन्यवेळी सकाळपर्यंत झोपले, तरी चालते. मात्र, नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहुर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते. नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो, अशी मान्यता आहे.
व्रताच्या कालावधी बटाटा अधिक प्रमाणात खाल्यास शरीराचे स्थुलत्व वाढते, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते. यामुळे आळस वाढतो. तसेच तळलेले, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय कांदा, लसूण यांसारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे. नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस, सात्विक, पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते.
नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे, केस कापू नयेत, असे म्हटले जाते. कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये. वाणी संयमित आणि शांत ठेवावी. खोटे बोलू नये. कोणाचाही अनादर करू नये, असे सांगितले जाते. आंघोळीच्या पाण्यात नीम, गुलाबजल मिळसणे उपयुक्त मानले गेले आहे, असे सांगितले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे.