बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यातून २२ हजार १२२ बालकांचे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत चौपटीपेक्षाही हे अर्ज अधिक असून, आता लॉटरी पद्धतीतून जाहीर होणाऱ्या निवड व प्रतीक्षा यादीकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
राज्यभरात २३ जानेवारीपासून ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातून ४०१ शाळा सध्या या प्रक्रिया सहभागी झाल्या आहेत. या शाळांमध्ये ‘आरटीई’च्या ४ हजार ८५४ जागा उपलब्ध असून, यंदा या जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील २२ हजार १५२ विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू असून, तीन वर्षांपासून या प्रवेशांना अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दाखल होणाऱ्या अर्जसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्यावर्षी जागांच्या तुलनेत तिप्पट म्हणजेच १६ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते, तर यंदा जागांच्या तुलनेत चौपटीपेक्षाही अधिक अर्ज दाखल झाल्याचे चित्र आहे. यंदा ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील शाळांची तसेच जागांची संख्याही कमी झालेली असली, तरी अर्जसंख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
३,९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
प्रवेश अर्ज दाखल झाल्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लॉटरी पद्धतीने जाहीर केली जाणारी विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी. ही यादी जाहीर झाल्यानंतर या यादीतील विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची प्रवेश पडताळणी समितीमार्फत पडताळणी केली जाईल. या समितीने पात्र ठरविल्यानंतरच विद्यार्थ्याचा संबंधित शाळेमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातील ४२२ ‘आरटीई’ पात्र शाळांमध्ये ‘आरटीई’च्या ४ हजार ५९२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३ हजार ९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.