विकासकामांमध्ये कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या पनवेल महापालिकेने गतवर्षी इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा सुरू केली. पुढील वर्षी इतर ठिकाणीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेने केवळ ४० विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर केजीचा प्रवेश सुरू केल्यामुळे यंदाही पालिकेच्या १० पैकी एकाच शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे, म्हणून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी गतवर्षीपासून इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू केला. पनवेल शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या दि. बा. पाटील विद्यालयाच्या इमारतीत ज्युनियर केजीच्या वर्गात ४० मुलांना प्रवेश देऊन शाळा सुरू झाली. त्यावेळी मोठ्या दिमाखात शाळा प्रवेश करताना, पुढील वर्षी पालिकेच्या इतर १० शाळांमध्येही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु वर्षभर इतर शाळांमध्ये इंग्रजी शाळा सुरू करण्याची तयारी प्रशासन करू शकले नाही. त्यामुळे यंदाही केवळ एकाच शाळेत एकाच वर्गाचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. २७ मार्चपासून प्रवेशअर्ज वाटपास सुरू होणार आहे.
पहिल्या वर्षी पालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळेला भरभरून प्रतिसाद दिला होता. आपल्या पाल्याला शाळाप्रवेश मिळावा, म्हणून अनेक दिवस शाळेचे खेटे मारत होते. पूर्णपणे मोफत शिक्षण असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांना प्रवेश देण्यात आला.
पूर्वीच्या नगरपालिका भागात महापालिकेच्या १० शाळा आहेत. इथेही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू व्हावी, अशी पालकांची इच्छा आहे. शाळेपासून तीन किमीच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्यामुळे, इतर शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग कधी सुरू होणार, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. महापालिका क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे करून नागरिकांना मुलभूत सोईसुविधा दिल्या जातात. परंतु शिक्षण क्षेत्राकडे प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून समोर येते आहे.
पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी शाळा सुरू करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. इतर शाळांमध्येही इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू व्हावेत, असा विचार आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. पालकांचा गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता.
– कीर्ती महाजन, प्रभारी प्रशासन अधिकारी
——–
१९ एप्रिलपर्यंत अर्ज
लोकनेते दि. बा पाटील विद्यालयात २६ मार्च ते १९ एप्रिलपर्यंत प्रवेश अर्ज दिले जाणार आहेत. बालकाचा जन्म १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या दरम्यान झालेला असावा. बालकाचे वय पाच वर्ष पाच महिने ३० दिवस इतके असणे गरजेचे आहे. या अर्जांची लॉटरी १७ एप्रिलला दुपारी ११ वाजता काढण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भारती धोंगडे ८०९७५७०६९७, सोनल भिसे ९७७३४६९८०३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.