RTE Admission: आरटीई अर्ज संख्येत वाढ, मोफत प्रवेशासाठी चुरस

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

मोफत प्रवेशप्रक्रियेत यंदा जिल्ह्यात अर्ज संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा २०२३-२४ यी शैक्षणिक वर्षासाठी २० हजार ८९० अर्ज आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही अर्जसंख्या चार हजाराने अधिक आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पालकांचे आता प्रवेशप्रक्रियेतील सोडतीकडे लक्ष लागले आहे.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेला विलंबाने सुरुवात झाली. प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाइन नोंदणीसाठीची प्रक्रिया दोन मार्चपासून सुरू झाली. सुरुवातीला १७ मार्च व त्यानंतर २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यंदा प्रवेशप्रक्रियेत ऑनलाइन नोंदणीची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी (२४ मार्च) रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जांची संख्या वाढली आहे. या वर्षी २० हजार ८९० ऑनलाइन अर्ज आले आहेत. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचे लक्ष आता प्रक्रियेतील पुढील वेळापत्रकाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा ऑनलाइन अर्ज भरण्यास पालकांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे मुदतवाढ मिळणार का, याबाबत चर्चा सुरू होती. त्याबाबत रविवार (२६ मार्च) सायंकाळपर्यंत स्पष्टता नव्हती. मात्र, तशी शक्यता कमी असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.

दोन वर्षानंतर पूर्ववत

कोव्हिडकाळात प्रवेशप्रक्रियेत दोन वर्षे अडचणी आल्या होत्या. आता प्रक्रिया पूर्ववत होत आहे. यंदा अर्जसंख्या वाढल्याने सोडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे. नामांकित शाळांसाठी अर्जसंख्या वाढल्याचेही सांगण्यात येते. यंदा प्रवेशप्रक्रियेत ५४७ शाळांचा सहभाग असून, चार हजार ७३ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी २० हजार ८९० अर्ज आहेत. अर्ज संख्या प्रवेश क्षमतेच्या पाच पट आहे. शिक्षण विभागाने पुढील वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही. सोडतीबाबतही अद्याप स्पष्टता नाही. सोडतीसह प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक; तसेच सूचनांकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळा ५४७

आरटीई प्रवेशक्षमता ४,०७३

जिल्ह्यातून प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज २०,८९०

२०२२मधील स्थिती

सहभागी शाळांची संख्या ५७५

आरटीई प्रवेशक्षमता ४,३०१

जिल्ह्यातून प्रवेशासाठी अर्ज संख्या १७,३९३

Source link

Career Newschhatrapati sambhajinagareducation newsMaharashtra Timesonline applicationsRTERTE Admissionआरटीईमोफत प्रवेश
Comments (0)
Add Comment