प्रवेश परीक्षांच्या केवळ सूचना आणि वेळापत्रके जाहीर करण्याची औपचारिकता पूर्ण करीत राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल), विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांसंबंधी येणाऱ्या समस्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांना संपर्कासाठी केवळ इ-मेलचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, हेल्पलाइनच्या माध्यमातून कोणतीही मदत केली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
‘सीईटी सेल’मार्फत राज्यभरातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी ‘एमबीए’च्या परीक्षांपासून या प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेदरम्यान राज्यभरातील विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. परंतु, ‘सीईटी सेल’शी संपर्क साधण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याने नाशिकमधील विद्यार्थ्यांना थेट पोलिसांकडे तक्रार दाखल करावी लागली.
– अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला असता, त्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आले नाही.
– याचसोबत एमबीए प्रवेशपरीक्षा आणि सेट एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षा देता आली नाही.
– परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांनी याबाबत ‘सीईटी सेल’शी इ-मेलद्वारे संपर्क केला. परंतु, ‘सेल’ने कोणतेही उत्तर न दिल्याची विद्यार्थ्यांची माहिती.
‘सीईटी सेल’चे आयुक्त महेंद्र वारभूवन यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही. तसेच जनसंपर्क विभागामार्फतही याबाबत कोणताही खुलासा केला जात नसल्याने, ‘सीईटी सेल’ केवळ सूचना आणि वेळापत्रक प्रसिद्धीद्वारे एकांगी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरच नव्हे तर, राज्याच्या खेड्या-पाड्यांमधील लाखो विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज केला आहे. गेल्या दोन वर्षांत परीक्षांना विलंब झालेला असला, तरी ‘सीईटी सेल’मार्फत विद्यार्थ्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेतली जात होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून मात्र, ‘सीईटी सेल’ केवळ सरकारी थाटात काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
समन्वयक नेमण्याची गरज!
एप्रिल ते जूनदरम्यान जवळपास तेरा प्रवेशपरीक्षा होणार आहेत. या परीक्षांबाबत समन्वय साधण्यासाठी कोणाचीही नेमणूक ‘सीईटी सेल’ने केलेली नाही. त्यामुळे काही समस्या उद्भविल्यास ‘सीईटी सेल’च्या हेल्पलाइन नंबर किंवा इ-मेलवर संपर्क साधण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय नाही. अशा समस्यांसाठी ‘सीईटी सेल’ने विभागीय किंवा जिल्हास्तरावर समन्वयक नेमण्याची गरज असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.