MBA CET: परीक्षेत विद्यार्थ्यांना वेगवेगळा वेळ, एमबीए सीईटी पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

MBA CET CELL: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या एमबीए सीईटी परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अडीच, काहींना तीन तर काहींना तीन तास २० मिनिटांचा वेळ मिळाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. काही केंद्रांवर अन्य ठिकाणची परीक्षा संपल्यावर तीन तासांनी परीक्षा सुरू झाली. या विद्यार्थ्यांना एमबीएच्या प्रवेश परीक्षेचे प्रश्न आधीच समजल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सीईटी कक्षाकडून २५ आणि २६ मार्चला एमबीएसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दररोज दोन सत्रांत आयोजित करण्यात आली. मात्र २५ मार्चला तांत्रिक अडचणींमुळे अनेक केंद्रांवर परीक्षा विलंबाने सुरू झाल्याचे प्रकार घडले. ‘माटुग्यांतील किंग्ज सर्कल कॉलेजमध्ये मला परीक्षाकेंद्र आले होते. प्रश्नपत्रिका सोडविताना परीक्षा १४७ मिनिटांनी संपली. त्याचवेळी वर्गातील अन्य विद्यार्थ्यांची परीक्षा १८० मिनिटांनी संपली. त्यांना ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला’, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.

कम्प्युटर प्रणालीत हस्तक्षेप करणे शक्य नाही. सीईटी सेलनेही तांत्रिक कर्मचारी नसल्याने ही समस्या केंद्राच्या पातळीवर सोडवण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही काय करायचे, याची कल्पना नव्हती, असेही या विद्यार्थिनीने नमूद केले.

पालघर येथील सेंट जॉन कॉलजेमधील परीक्षा केंद्रावरही प्रत्येक विद्यार्थ्याच्या कम्प्युटरवर वेगवेगळा वेळ दिसत होता. ‘घड्याळानुसार १५० मिनिटे होताच परीक्षा बंद होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे काही प्रश्नांवर विचार न करताच शेवटच्या काही मिनिटांमध्ये तातडीने उत्तरे सोडविली. मात्र थोड्याच वेळाने तुमचा कम्प्युटर बंद होईपर्यंत पेपर सोडवा, असे सांगण्यात आले.

त्यातून आम्हाला पुन्हा कोणते प्रश्न तातडीने सोडविले हे पाहून त्यांची सुधारित उत्तरे लिहावी लागली. या प्रक्रियेत बराच वेळ वाया गेला आणि विद्यार्थ्यांचा गोंधळही उडाला. केंद्रावरील बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा १८० मिनिटांनी संपली. मात्र काही विद्यार्थ्यांना १५०, तर काहींना २०० मिनिटे वेळ मिळाला’, असे एका विद्यार्थिनीने नमूद केले.

या गोंधळाबाबत विचारण्यासाठी सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच मेसेज पाठवूनही त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे सीईटी सेलच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

‘पनवेल येथील केंद्रावर दुपारी २ ते ४.३० या वेळेत परीक्षा पार पडली. मात्र याच सत्राची नागपूर केंद्रावरील परीक्षा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. त्यातून या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका समजली असण्याची शक्यता विद्यार्थी वर्तवत आहेत.

Source link

CET CellCET Cell CarelessCET Cell Ignoring issuesCET cell managementCET ExamCET StudentsexamMaharashtra TimesMBA CETएमबीए सीईटी परीक्षासीईटी सेलसीईटी हेल्पलाइन
Comments (0)
Add Comment