पती-पत्नीमध्ये अहंकार नसावा
रामायणात जेव्हा सीतेचा स्वयंवर चालू होता. शिवाचे धनुष्य तोडणाऱ्याशी सीतेचा विवाह होणार होता. ही अट सीतेचे वडील राजा जनक यांनी ठेवली होती. अनेक राजे आणि वीरांनी प्रयत्न केले, पण कोणीही धनुष्य हलवू शकले नाही. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला आज्ञा दिली आणि म्हणाले जा राम धनुष्य उचल. श्रीरामांनी प्रथम आपल्या गुरूंना नमस्कार केला. नंतर भगवान शंकराचे ध्यान करून नमन केले. धनुष्य उचलले आणि खेळण्यासारखे तोडले. या घटनेत एक बोध दडलेला आहे. तात्विकदृष्ट्या समजून घेतल्यास, धनुष्य हे अहंकाराचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपल्यात अहंकार आहे तोपर्यंत आपण आपलं आयुष्य कुणासोबत घालवू शकत नाही. अहंकार मोडूनच वैवाहिक जीवनात प्रवेश करावा. पती-पत्नीमध्ये अहंकार नसावा, तरच जीवनात सुख-शांती नांदू शकते.
पती-पत्नीची एकमेकांवरील भक्ती आणि विश्वास
श्रीरामांना वनवासात जावे लागले आणि सीतेने वनवासात सोबत जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती, सीतेने आई कौशल्यासोबत अयोध्येत राहावे अशी त्यांची इच्छ होती. तसेच, सीतेने जाऊ नये, अशी कौशल्या मातेचीही इच्छा होती. परंतू सीतामातेला श्रीरामांसोबत वनवासात जायचे होते. श्रीरामांनी सीतेला समजावून सांगितले की, वनात अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल. भयंकर राक्षस असतील, साप असतील, जंगलातील ऊन, थंडी, पाऊस हे सर्व भयंकर असेल, अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. राजकन्येला या सर्व संकटांचा सामना करणे शक्य नाही.
श्रीरामांनी खूप समजावले, पण सीतेने श्रीराम आणि माता कौशल्या यांच्याजवळ आपले वनवासात जाण्याचे म्हणणे मांडले आणि श्रीरामासोबत वनवासात गेली. सीतेने श्रीरामांप्रती भक्तीची आणि विश्वासाची भावना दाखवली आणि तीही आपल्या पतीसोबत वनवासाला गेली. या समर्पणाच्या भावनेमुळे श्री राम आणि सीता यांचे वैवाहिक जीवन दिव्य मानले जाते. पती-पत्नीमध्ये समर्पणाच्या भावनेनेच प्रेम टिकून राहते.
पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे
श्रीराम, लक्ष्मण, सीता यांना वनवासात जाताना गंगा नदी पार करावी लागली. त्यावेळी एका नाविकाने त्यांना नावेतून गंगा नदीच्या पलीकडे नेले होते. तेव्हा त्या नाववाल्याला देण्यासाठी श्रीरामाकडे काहीच नव्हते. अशा स्थितीत जेव्हा सीतेने श्रीरामाच्या चेहऱ्यावर संकोचाचे भाव पाहिले तेव्हा सीतेला ताबडतोब आपली अंगठी काढून नाविकाला भेट म्हणून द्यायची इच्छा झाली, पण नाविकाने अंगठी घेतली नाही. वनवास संपवून परत येताना तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेन, असे त्याने सांगितले. यातून असा बोध मिळतो की, प्रत्येक परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे.