मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) उन्हाळी सत्र परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, या परीक्षेत विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. परीक्षा अर्धा तास ते सव्वा तास विलंबाने सुरू होणे, एका बाकावर दोन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेणे, ७५ गुणांऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका देणे, परीक्षाकेंद्र असल्याबाबत कॉलेजांनाच माहिती नसणे अशा गोंधळाचाच पेपर सोडवावा लागला.
ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजमध्ये मंगळवारी १०.३० वाजता ‘आयडॉल’ची सुरू होणार होती. विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजल्यानंतर परीक्षाकेंद्रावर सोडण्यात आले. परीक्षा कक्षात जाताच विद्यार्थ्यांचे क्रमांकही लिहिले नसल्याचे उघड झाले. परीक्षा होणार असल्याची शिक्षकांनाही माहिती नव्हती. काही वेळाने एका बाकावर दोन वेगवेगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना बसविण्यात आले.
एका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ११ वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली. तर काही विद्यार्थ्यांना ११.४५ वाजता प्रश्नपत्रिका मिळाली. हा सर्व गोंधळ सुरू असतानाच मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना ७५ गुणांऐवजी ६० गुणांची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका परत देण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. तसेच नवी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देत असल्याचे सांगितले. मात्र काही वेळाने पुन्हा तीच प्रश्नपत्रिका लिहिण्यास सांगितले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.
तसेच केंद्रावर शिक्षकांकडून प्रत्येक विषयाचे किती विद्यार्थी आहेत, याबाबत कोणतीच कल्पना नसल्याने गोंधळाचे वातावरण होते, असेही विद्यार्थ्याने नमूद केले.
मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स आणि वाणिज्य कॉलेजमधील केंद्रावरही अर्ध्या तासाच्या विलंबाने परीक्षा सुरू झाली. विद्यार्थी परीक्षा कक्षात पोहोचल्यानंतर या केंद्रावर परीक्षा क्रमांक लिहिण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातून दुपारी २.३० वाजताची परीक्षा ३ वाजता सुरू झाली, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. तर काही ठिकाणी कॉलेजांना परीक्षाकेंद्र असल्याबाबतच माहिती नव्हती. विद्यापीठाकडून उशिरा माहिती समजल्यानंतर नियोजन करण्यात आल्याचे समजते.
काही केंद्रांवर परीक्षा विलंबाने सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना ६० गुणांची आणि ७५ गुणांच्या प्रश्नपत्रिका दिल्याबाबत तांत्रिक समस्या झाली असून त्यावर विद्यापीठ योग्य तो निर्णय घेईल. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
केंद्र उपनगरातील, परीक्षा दक्षिण मुंबईत
पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने उपनगरातील केंद्राचा पर्याय विद्यापीठाला दिला होता. मात्र परीक्षेसाठी विद्यापीठाने तिला मुंबई सेंट्रल येथील कॉलेज दिले. त्यातून आता ही सर्व पेपर देण्यासाठी उपनगरातून मुंबई सेंट्रलला यावे लागणार आहे.