नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि एनईपी २०२० वर आधारित नवीन पाठ्यपुस्तके अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनसीईआरटीचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कवरील राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असल्याप्रमाणे २२ भाषांमध्ये नवीन एनसीईआरटी पाठ्यपुस्तके विकसित केली जातील. देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रादेशिक किंवा मातृभाषेत शिक्षण देणे हे शिक्षण मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट २२ भाषांमधील पाठ्यपुस्तके विकसित करण्यास सांगितले. हे बहुभाषिक शिक्षण देण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असेल. एनसीईआरटीने विकसित केलेला ‘जादुई पिटारा’ हे अध्यापन-शैक्षणिक साहित्य मुक्त शैक्षणिक संसाधनांच्या रूपात प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे नेले जाईल, असेही प्रधान यावेळी म्हणाले. याला एक जनचळवळ बनवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.