मुख्यमंत्र्यांनी पदवी स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचे आभार मानले. आदरणीय डी.वाय. पाटील यांचे माझ्याप्रती असलेल्या प्रेमामुळे डि.लीट पदवी मला विद्यापीठाने दिली. यासाठी मी या जागतिक विद्यापीठाचा आभारी आहे. ही माझ्यासाठी गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.
माझा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे याच विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमएस झाला. तो ऑर्थोपेडिक सर्जन आणि खासदार आहे. त्याच विद्यापीठाने मला डि.लीट पदवी देणे ही सन्मानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कौटुंबिक जबाबदारीमुळे मी शिक्षण पूर्ण करु शकलो नाही पण माझ्या मनात जिद्द आणि खंत होती. त्यामुळे व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मी बीए डिग्री घेतली. त्यात चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डि.लीट पदवी मी महाराष्ट्रातील संघर्ष करुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो, असे ते म्हणाले.
डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून आतापर्यंत प्रख्यात वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, समाजसुधारक आप्पासाहेब धर्माधिकारी, क्रिकेटर सुनील गावस्कर, ब्रायन लारा, इन्फोसिस संस्थापक नारायण मुर्ती, टेनिस खेळाजू लिएंडर पेस, माजी लोकसभा अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्यासह अनेक दिग्गजांना डि.लीट पदवी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
डी.वाय. पाटील हे देशाच्या शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ आहेत. त्यांनी शिक्षणाला ठराविक साच्यातून बाहेर आणण्याचे काम केले. शिक्षणाला कोणत्या मर्यादा नसते हे त्यांनी दाखवून दिले. २०-२२ वर्षापूर्वी नवी मुंबईत विद्यापीठाची स्थापना केली. संस्थेच्या स्थापनेने शहराचा कायापालट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.