बारावीनंतर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागते. सीईटीतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ते अभ्यासक्रमांना प्रवेश इथपर्यंत सर्व प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत राबविले जाते.
या प्रक्रियेत बऱ्याचदा विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर अडचणींना सामोरे जावे लागते. सीईटी कक्षाकडे ई-मेलद्वारे अथवा हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करूनही प्रश्नाची सोडवणूक न झाल्यावर विद्यार्थी कक्षाच्या कार्यालयात येतात. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
विद्यार्थी कक्षाच्या कार्यालयात दाखल झाला, की प्रवेशद्वारावर नेमलेल्या सुरक्षारक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मात्र सीईटी कक्षातील कोणीही तज्ज्ञ त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांना कार्यालयात प्रवेश मिळत नाही. सुरक्षारक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनावरच विद्यार्थ्यांना माघारी परतावे लागते. त्यातून विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.
याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे युवा सेनेने तक्रार केली आहे. ‘एमबीए विद्यार्थ्यांना मुंबईबाहेरील पुणे केंद्र देण्यात आले होते. त्याबाबत तक्रार करण्यासाठी सीईटी कक्षाच्या कार्यालयात गेल्यावर तिथे सुरक्षारक्षकांकडून विद्यार्थ्यांना माहिती दिली जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यातून काही विद्यार्थ्यांना चुकीची माहिती दिली जात होती. परिणामी यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. तसेच सीईटी कक्ष दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेते. या विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष, तेथे आवश्यक तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, अशी मागणी युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी केली.