नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांना पूर्वीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. याचबरोबर महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडेही कल वाढू लागला आहे. या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता पाहता, अनेक पालक आपल्या मुलांना या शाळांत प्रवेश घेण्यास उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आत्तापर्यंत या शाळांत नर्सरीच्या २४० जागांसाठी १,१४५ अर्ज आले.
महापालिकेच्या वतीने शहरात पहिली ते दहावीपर्यंत शाळा चालवल्या जातात. त्यात मराठी माध्यमाबरोबर हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आहेत. मात्र या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत. तेथे ५५ हजारांच्या घरात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके गणवेश, बुट, दप्तर, सर्व काही अगदी मोफत दिले जाते. शिवाय माध्यान्ह भोजनही मिळते.
शाळांच्या इमारतीही आकर्षक आहेत. या शाळांचा दहावीचा निकालही उत्तम असतो. त्यामुळे पालिका शाळांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सधन कुटुंबांतील पालकांचाही ओढाही या शाळांकडे आहे.
याच पार्श्वभूमीवर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा पाच वर्षांपूर्वी सुरू केल्या. यातील एक शाळा सीवूड्स सेक्टर ५० येथे आहे. तर दुसरी शाळा कोपरखैरणे सेक्टर १२ येथे आहे. दरवर्षी या शाळांमध्ये, नर्सरीचे प्रवेश केले जातात आणि वर्ग पुढे वाढवले जातात. दोन्ही शाळा मिळून नर्सरीला २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रवेश अर्ज वाटप करण्यात आले. २५ मार्च ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार महापालिकेकडे १,१४५ अर्ज आले.
शैक्षणिक दर्जा उत्तम
दरवर्षी या शाळांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असते. यावर्षी ही संख्या हजाराच्या पुढे गेली आहे. महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांतही मोफत शिक्षण दिले जाते आहे. शिवाय शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. प्रवेश प्रक्रियेत शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.