यूजीसीनेही बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली असून येत्या काही दिवसांत ही यादी पुन्हा एकदा जाहीर केली जाणा आहे. आता यूजीसीने तामिळनाडूतील दोन संस्थांबाबत सार्वजनिक नोटीस जारी केली असून विद्यार्थ्यांनी या स्वयंघोषित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणे टाळावे, असे यूजीसीने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यापीठाच्या पात्रतेबद्दल शंका असल्यास त्यांनी यूजीसीच्या वेबसाइटवर पडताळणी करावी. यूजीसी द्वारे बोगस विद्यापीठ आणि मान्यताप्राप्त संस्थांची यादी प्रकाशित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी बनावट विद्यापीठांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
अशा बनावट विद्यापीठांवर कारवाई करून ती बंद करावीत यासाठी वेळोवेळी राज्य सरकारांना पत्रेही लिहिली जातात. यासंदर्भात पुन्हा एकदा नवीन यादी जाहीर होणार आहे. यासोबतच नियमांविरुद्ध चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करून त्या बंद करण्यात याव्यात, असे पत्रही राज्य सरकारांना देण्यात येणार आहे.
यूजीने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर अल्टरनेटिव्ह मेडिसीन्स आणि नॅशनल बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिनतर्फे विविध पदवी अभ्यासक्रम आणि कार्यक्रम चालविले जात आहेत. या दोन्ही संस्था यूजीसी कायदा १९५६ च्या विरोधात अभ्यासक्रम चालवत असून विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.