सुरुवातीला आपण प्रकल्प म्हणजे काय, हे जाणून घेऊया. अस्थायी स्वरुपात उत्पादन, सेवा किंवा परिणामासाठी घेतलेले एखादे कार्य म्हणजे प्रकल्प होय. हे अस्थायी यासाठी, की त्याची सुरुवात कधी करायची, प्रकल्प पूर्ण कधी व्हायला हवा, याचा कालावधी ठरलेला असतो. त्याचबरोबर त्याची व्याप्ती आणि संसाधनेही निश्चित करण्यात आलेली असतात. हा प्रकल्प ‘रूटीन’ नसून ‘युनिक’ असतो. एखादे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याची आखणी केलेली असते. अशा या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी टीमवर्क आवश्यक असल्याने एकत्रित काम करण्यासाठी विविध संस्था आणि अनेक ठिकाणांवरील लोकांचा यात समावेश केला जातो. उदाहरणार्थ, जगात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन, पूल उभारणी, आपत्कालीन व्यवस्थेत राबवली जाणारी यंत्रणा, एखादे नवीन कारचे उत्पादन किंवा ग्राहकोपयोगी वस्तू बाजारात आणणे, एखादा प्रमोशनल इव्हेंट हे सारे प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प तज्ज्ञांच्या देखरेखीखाली, वेळेत, दिलेल्या बजेटमध्ये पूर्ण केले जातात. अशा प्रकल्पांसाठी संस्थेला प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असलेल्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. प्रकल्प व्यवस्थापन ही ज्ञान, कौशल्ये, साधने आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून आवश्यक उद्दिष्ट पूर्ण करण्याची योजना असते. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
अँडरसन इकॉनॉमिक ग्रुप ऑफ सर्व्हेनुसार, प्रकल्प व्यवस्थापन आता जवळपास ८५ व्यवसायांमध्ये महत्त्वपूर्ण बनले आहे. जवळपास सर्वच उद्योगांमध्ये प्रकल्प व्यवस्थापकाची गरज भासते. इंजिनीअर, इव्हेंट मॅनेजर, व्यावसायिक, फायनान्स एक्स्पर्ट, आयटी प्रोफेशनल असे कोणतेही क्षेत्र असो, तेथे प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती महत्त्वपूर्ण ठरते. तुम्ही करिअरचे फायनान्स, मार्केटिंग, आयटी, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, कन्स्ट्रक्शन, हेल्थ केअर, कन्सल्टन्सी, बँकिंग किंवा एखादा व्यवसाय असे कोणतेही क्षेत्र निवडा, त्यासाठी तुम्हाला प्रकल्प व्यवस्थापनाचे ज्ञान आवश्यक ठरते.
आणखी एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की प्रकल्प व्यवस्थापन अभ्यासक्रम केलेल्यांना मिळणारे वेतन हे अभ्यासक्रम न केलेल्यांच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहे. भारतात प्रकल्प व्यवस्थापकांना प्रतिवर्षी सरासरी १६ लाख रुपये इतके वेतन मिळते. त्यातून आपल्याला या क्षेत्राचा वाढत असलेला आवाका लक्षात येईल.