कामदा एकादशी व्रत तिथी आणि मुहूर्त
पंचांगानुसार यावर्षी कामदा एकादशीचे व्रत काही भागात १ तारखेलाच असल्याचे दिसते. तर काही भागात १ आणि २ एप्रिल रोजी पाळले जाणार असे दिसते आहे. पंचांगानुसार, चैत्र शुक्ल एकादशी तिथी १ एप्रिल २०२३ रोजी अर्धरात्रौ १ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २ एप्रिल २०२३ रोजी पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी समाप्त होईल.
स्मार्त आणि भागवत एकादशी संभ्रम
भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. परंतू यंदा महाराष्ट्रातील काही राज्यात याबाबतीत संभ्रम निर्माण होत आहे कारण दि.१ एप्रिल रोजी शनिवारी कामदा एकादशी दिलेली आहे. दि.२ एप्रिल रोजी द्वादशी समाप्ती ६ वाजून २४ मिनिटांनी होईल. ज्या गावी दि २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपूर्वी सूर्योदय होत असेल तेथे द्वादशी तिथीची वृद्धि होत असल्याने स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी असणार आहेत.
महाराष्ट्रातील तुमच्या गावाला एकादशी कधी कराल?
महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक संगमनेर शिर्डी मालेगाव बारामती फलटण सातारा कराड कोल्हापूर सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगाव, गोकाक, कारवार, मंगळूर, उड्डपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर या प्रदेशात शनिवारी १ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह,अहमदनगर,औरंगाबाद,जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा व संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजापूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट,गदग,हावेरी, म्हैसूर, बेंगलोर, संपूर्ण मध्य प्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा व पंजाब या प्रदेशांमध्ये शनिवारी दि.१ एप्रिल रोजी स्मार्त आणि रविवारी दि. २ एप्रिल रोजी भागवत एकादशी आहे.
एकादशी व्रत महत्व आणि कथा
चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते. कामदा एकादशीला भगवान नारायण यांचे पूजन केले जाते. प्राचीन काळात राजा दिलीप यांना गुरु वशिष्ठ यांनी या व्रताचे महत्त्व सांगितले होते. भगवान नारायण यांच्या उपासनेमुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे. भगवान नारायण यांचे कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्यासारख्या महाभयंकर पापातूनही मुक्ती मिळू शकते, असे सांगितले जाते. कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यात अक्षम असाल तर हे उपाय अमलात आणू शकता, अंघोळ झाल्यावर विष्णू किंवा कृष्णाची पूजा करावी दिवसभर सात्त्विक राहावे. मन पवित्र ठेवावे.