फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या श्रेयाची लढाई सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीची किनारही या वादाला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. अपेक्षेप्रमाणे मनसे व भाजपच्या संभाव्य युतीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना, ‘२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असणार,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं युतीची शक्यता धूसर असल्याचं बोललं जातंय. अर्थात, महापालिका निवडणुकीतील युतीबाबत त्यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही. २०२४ साठी अद्याप बराच अवधी असल्यानं मधल्या काळात बरंच काही घडू शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये संघटनात्मक बदल होत असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. ‘तसं काहीही होणार नाही. प्रदेशाध्यक्ष बदलाचीही कुठली चर्चा नाही. आमचे दिल्ली दौरे नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होत आहेत. मी पुन्हा दिल्लीला जाणार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.
तेजस ठाकरे यांचं स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्तानं पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ‘सामना’मध्ये जाहिरात देऊन खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळं तेजस यांच्या राजकारणातील पदार्पणाची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत विचारलं असता, फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ‘ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेनं नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडं अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील,’ असं सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केलं.