जे. जे. कला महाविद्यालय, उपयोजित महाविद्यालय आणि वास्तुकला महाविद्यालयाचे अभिमत महाविद्यालयात रूपांतरण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) तत्वतः मंजुरी मिळाली आहे. यूजीसीच्या अटी, शर्तींची पूर्तता केल्यानंतर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होईल. त्यासाठी सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये सल्लागाराची नियुक्ती केली होती.
महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर २०२२ ला टास्क फोर्स स्थापन केला होता. त्यात, सल्लागाराने दिलेले प्रस्ताव, आराखडे यांची पूर्तता करण्यासाठी, यूजीसीच्या अटींची पूर्तता करून टास्क फोर्सने त्यांचा अंतरिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकारकडून या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयाचे अभिमत विद्यापीठात रूपांतरण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य सरकारला अभिमत विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी सुरुवातीस कंपनीची स्थापना करावी लागेल. त्यातील, ‘कलम ८ कंपनी’ अंतर्गत अभिमत विद्यापीठ सुरू केले जाईल.
राज्य सरकारकडून अहवालास मंजुरी मिळताच ही कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कंपनीकडे महाविद्यालयाची सर्व मालमत्ता हस्तांतरीत केली जाईल. त्यानंतर अभिमत विद्यापीठ सुरू होईल.
तसेच यूजीसीकडून अभिमत विद्यापीठ सुरू करण्यासाठीही त्याचवेळेस अंतिम मान्यता घेतली जाईल. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून पाच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेक्शन ८ कंपनी म्हणजे काय?
धर्मादाय तत्त्वावर कार्य करण्यासाठी कंपनी स्थापन करायला यानुसार परवानगी दिली जाते. या कंपनीला झालेला नफा कंपनी सुरु करण्याच्या उद्देशासाठीच खर्च करता येतो. तसेच कंपनीला झालेला नफा भागधारकांना वितरीत करता येत नाही. सेक्शन ८ कंपनी ही ‘ना नफा’ तत्वावरील संस्था म्हणून कार्य करते.