शनिवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेची सूचना केवळ एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी मिळाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. (जनसंवाद)-१च्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आजवर कधीही वेळापत्रक दिसत नसताना एकाएकी परीक्षा घेण्यात येत असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली.
एम.ए. (जनसंवाद) या अभ्यासक्रमाची प्रथम सत्राची परीक्षा शनिवार, १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र, या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना ३१ मार्च रोजी दुपारी सूचना देण्यात आली. केवळ, एक दिवस आधी परीक्षेची सूचना आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि प्राध्यापक परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शोध घेत होते. मात्र, त्यांना कुठेही वेळापत्रक मिळाले नाही. शुक्रवारी परीक्षेबाबत माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक संकेतस्थळावर आढळले नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी यासंदर्भात संपर्क साधला. परीक्षेचे वेळापत्रक फेब्रुवारी महिन्यातच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना ही माहिती दिली नाही, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रेदेखील शुक्रवारी सायंकाळपासून देण्यास प्रारंभ झाला.
एम.ए. भाग-१ची ही हिवाळी परीक्षा असून ती डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, या परीक्षेलाही उशीर झाला आहे. हिवाळ्यात घेतली जाणारी ही परीक्षा लांबत जाऊन आता उन्हाळ्याच्या तोंडावर घेण्यात येते आहे. १, ३, ५ आणि ८ एप्रिल रोजी या अभ्यासक्रमाचे चार पेपर होणार आहेत. करोनाकाळात पहिल्यांदाच संपूर्ण थीअरी स्वरूपात आणि दुसऱ्या परीक्षाकेंद्रावर ही परीक्षा होते आहे.