नाशिक ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी सकाळी साडेसहा वाजेपासून शहर व ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर सरकारवाडा पोलिस, तर परीक्षा व्यवस्थापनासाठी ग्रामीण पोलिस कार्यरत होते. खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धेत असलेल्या १,८७९ पैकी ८४७ उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. तर, १ हजार ३२ उमेदवारांचे आता अंतिम निकालाकडे लक्ष लागले आहे. या लेखी परीक्षेत गणिताचे प्रश्न काहीसे कठीण होते, असे उमेदवारांनी सांगितले.
नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई पदांसाठी २ ते २० जानेवारीदरम्यान मैदानी चाचणी पूर्ण झाली. या चाचणीत ५० टक्के गुण मिळवलेल्या एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. त्यांची रविवारी (दि. २) सकाळी दहा वाजता लेखी परीक्षा घेण्यात आली. या मैदानी चाचणीच्या निकालात पहिल्या २९ उमेदवारांना ५० पैकी ५० गुण मिळाले. हे सर्व माजी सैनिक आहेत.
सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा ‘कटऑफ’ ४३ गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा ४२, महिला ४०, प्रकल्पग्रस्त ३६, अनाथ ३०, खेळाडू २९, भूकंपग्रस्त २६ आणि पोलिस पाल्य २५ या गुणांचा ‘कटऑफ’ आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचा ‘कटऑफ’ अधिक राहणार असून, अंतिम गुणवत्ता यादीकडे सर्वांचे लक्ष आहे.
परीक्षेतील टप्पे…
– बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, मराठीसह विविध विषयांवर पर्यायी स्वरुपात शंभर प्रश्न विचारले
– ‘बायोमेट्रिक’द्वारे उमेदवारांची ओळख पडताळून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला
– साडेअकरा वाजेपर्यंत लेखी परीक्षा संपल्यानंतर बारा वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्त कायम होता
शिपाई पदभरती
रिक्त जागा : १६४
प्राप्त अर्ज : १८,९३५
मैदानी चाचणीत : ११,२४४
२५पेक्षा जास्त गुण : ४,५१८
लेखीसाठी निवड : १,८६१
लेखीत हजर : १,०३२