हायलाइट्स:
- सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वादाचा नवा अंक.
- महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटलांवर केले थेट आरोप.
- विरोधकांचे उद्योगव्यवसाय मोडीत काढण्यासाठी मंत्रिपदाचा वापर!
कोल्हापूर: ‘पालकमंत्री सतेज पाटील हे मंत्रिपदाच्या बळावर दुष्ट आणि क्रूरतेचे राजकारण करत आहेत. मंत्रिपदाचा गैरवापर करून राजकीय विरोधकांचे उद्योगव्यवसाय मोडीत काढण्याचे पाप करत आहेत. तरुण वयात त्यांना मंत्रिपद मिळाले आहे, त्या मंत्रिपदाचा वापर त्यांनी समाजाच्या सदुपयोगासाठी करावा. हे सत्ताचक्र आहे, ते बदलणारे असते. उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही’, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना इशारा दिला. ( Dhananjay Mahadik Slams Satej Patil )
वाचा: मुंबई लोकलवरील निर्बंध कसे उठणार?; सूत्र ठरलं, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कारभाराचा समाचार घेतला. महाडिक म्हणाले, ‘सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. साखर उद्योग संकटातून बाहेर पडावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक हे थकीत एफआरपी वरून भीमा कारखान्यावर कारवाई व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार विभागाकडे तक्रार करत आहेत. मंत्री पाटील आणि खासदार मंडलिक हे त्यांच्या लेटरहेडवरून अशा तक्रारी करत असतील तर ते चुकीचे आहे. खासदार, आमदार आणि मंत्रिपद हे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, शहर विकासासाठी नवनवे प्रकल्प आणण्यासाठी असते. मात्र हे दोघे जण मंत्रिपद आणि खासदारकीचा वापर भीमा कारखान्यावर कारवाईसाठी करत आहेत. पालकमंत्री पाटील हे मनोरुग्ण आहेत. राजकीय विरोधकांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले पाहिजेत अशा विकृत मानसिकतेतून ते काम करत आहेत.’
तक्रार करणाऱ्यांनी महापालिकेचा कोट्यवधीचा घरफाळा बुडवला
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘थकीत एफआरपी व कर्मचाऱ्यांची देणी यावरून भीमा सहकारी साखर कारखान्यावर कारवाई व्हावी म्हणून पालकमंत्री पाटील हे तक्रार करत आहेत. मात्र त्यांच्याशी निगडीत डीवायपी मॉल, हॉटेल सयाजी या मालमत्तेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडविला गेला आहे. पन्नास ते साठ हजार फुटांचे अतिरिक्त बांधकाम केले आहे. याविषयी ते चकार शब्दही बोलत नाहीत. कॉलेजचा ६४ लाखांचा घरफाळा थकविला म्हणून महापालिकेने नोटीस काढली. त्यानंतर ३५ लाख भरले. ड्रीमवर्ल्डचा घरफाळा थकीत आहे. आता हा प्रोजेक्ट ते महापालिकेकडे हस्तांतरित करत आहेत. मंत्रिपदाचा वापर स्वत:च्या सोयीसाठी होत आहे.’
वाचा:आरक्षणावर फडणवीसांची नवी भूमिका; म्हणाले, ‘तो संघर्ष टाळण्यासाठी…’