मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेत अनेकांना गैरहजर दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. आता हा गोंधळ निस्तरण्यासाठी परीक्षा केंद्रांवरील हजेरी पत्रक आणून ते विद्यापीठाला सादर करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यातच काही विद्यार्थ्यांचा निकालच दिसत नसल्याने विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पाचव्या सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये पडली. याचा निकाल विद्यापीठाने विलंबाने जाहीर केला. मात्र त्यातही गोंधळ घालत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेत गैरहजर दाखविले आहे. विद्यापीठाने एका कॉलेजमधील सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले.
मुंबईतील अन्य काही कॉलेजांमधील काही विद्यार्थ्यांनाही गैरहजर दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली. परीक्षा देऊनही विद्यार्थी गैरहजर दाखविल्याने त्यांच्या प्रश्नपत्रिका नक्की कोठे गेल्या याचा शोध विद्यापीठाकडून घेतला जात आहे.
काही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विद्यापीठाकडील नोंदणी क्रमांक (पीएनआर) देण्यात आल्याने गोंधळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हा गोंधळ निस्तरला नसतानाच विद्यापीठाने २५ एप्रिलपासून पुनर्परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता पुनर्परीक्षेचा अर्ज भरायचा की नाही या संभ्रमात विद्यार्थी आहेत.
‘विद्यापीठाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत विद्यापीठाने समिती नेमून हा गोंधळ का होतो याचे कारण शोधून ते पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया युवा सेनेच्या (शिंदे गटाचे) सचिन पवार यांनी दिली. ‘विद्यार्थ्यांनी चुकीच्या क्रमांकावर काळ्या रंगाने रंगवल्याने (बबलिंग) किंवा चुकीचा बारकोड नमूद केल्याने विद्यार्थी गैरहजर दिसतात. कॉलेजकडून विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. पुनर्मूल्यांकनाची सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरावा’, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले.
नवव्या सत्राचे निकाल १२० दिवसांनी
विधी अभ्यासक्रमाच्या नवव्या सत्राचे निकाल तब्बल १२० दिवसांनी लावण्याचा प्रताप विद्यापीठाने केला आहे. परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लावणे अपेक्षित असताना विद्यापीठाने इतका विलंब केला आहे. विद्यापीठाने निकाल लावण्याआधीच पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्यातून विद्यापीठाच्या कामकाजाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुनर्परीक्षा नोव्हेंबरमध्ये; मात्र निकालाची प्रतीक्षा
एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या एका विषयाची पुनर्परीक्षा विद्यार्थ्याने नोव्हेंबरमध्ये दिली होती. मात्र तब्बल चार महिन्यांचा काळ लोटल्यानंतरही त्याचा निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आलेला नाही. ‘निकाल न मिळाल्याने मुलाला न्यायालयात वकिली करण्यासाठी सनद मिळत नाही. त्याला अन्य नोकऱ्यांसाठीही अर्ज करता येत नाही. याबाबत कॉलेजकडे विचारणा केल्यावर ते विद्यापीठाकडे बोट दाखवतात. त्यातून आता मुलाचा निकाल कधी मिळणार, असा प्रश्न पालक जमिला शेख यांनी उपस्थित केला आहे.