सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचा निकाल वेगवान पद्धतीने जाहीर होण्यासाठी, आगामी परीक्षांतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (पीजी) परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून, त्या प्राध्यापकांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर ऑनलाइन पद्धतीने तपासण्यासाठी देण्यात येतील. या माध्यमातून विद्यापीठाचे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करून, आगामी (२०२३-२४) शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.
निविदा प्रक्रिया राबवणार
करोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष अजूनही सुरळीत झालेले नाही. ही परिस्थिती असतानाच, जूनपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, शैक्षणिक वर्ष सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनस्क्रीन करून निकाल जलदगतीने जाहीर करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून, तांत्रिक मदत करणाऱ्या खासगी कंपन्यांची निवड करण्यात येईल. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सहा जूनपासून सुरुवात होणार आहे.
मूल्यांकनाची प्रक्रिया काय?
-अभ्यासक्रमाचा पेपर झाल्यानंतर, संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येईल.
– स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर, संबंधित उत्तरपत्रिका प्राध्यापकाच्या लॉग इनवर पाठविण्यात येईल.
– प्राध्यापकाने लॉग इन आयडीचा वापर करून पेपर ऑनस्क्रीन तपासायचा आहे.
– तपासून झाल्यानंतर, ऑनलाइन पद्धतीने एकूण गुणांची माहिती उपलब्ध होईल. ही माहिती पुन्हा विद्यापीठाकडे परत येईल.
– अशा पद्धतीने इतर विषयांचे गुण आल्यानंतर, ऑनलाइन गुणपत्रिका प्रसिद्ध करण्यात येईल.
– त्यानंतर गुणपत्रिकांची छपाई करून विद्यार्थ्यांना सोपवली जाईल.
– त्यामुळे विद्यार्थ्यांचा शेवटच्या विषयाची परीक्षा झाल्यानंतर, काही दिवसांतच निकाल प्राप्त होईल.
पहिला टप्पा ६४ हजारांचा
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाने ऑनलाइन पद्धतीने यशस्वी मूल्यमापन केले आहे. त्यानुसार हा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात साधारण चार हजार आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये ६० हजार विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. पहिल्या टप्प्यात या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
ऑनलाइन पद्धतीचा राज्यात अवलंब
राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा निकाल महिन्यात जाहीर होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात असून, तेथे ऑनलाइन मूल्यांकन पद्धतीने निकाल तयार करण्याचे काम करण्यात येत आहे, असेही डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन मूल्यांकन कसे करणार?
– ऑनलाइन मूल्यांकनासाठी निविदा प्रक्रिया राबवून, कंपनीची निवड करण्यात येईल.
– कंपनीद्वारे सर्व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग होईल. सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया प्रामुख्याने विद्यापीठे आणि केंद्रात अधिकाऱ्यांच्या देखरेखीत होईल.
– या उत्तरपत्रिका प्राध्यापकांच्या लॉग इनला पाठविण्यात येतील.
– ऑनलाइन प्रणालीत प्रश्न, गुण, चूक, बरोबर आदींची माहिती असेल. प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासतांना, गुणांवर क्लिक करावे लागेल.
– तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, आपोआप एकूण गुण दर्शविण्यात येईल. हे गुण पुन्हा विद्यापीठाच्या प्रणालीत जमा होऊन, निकाल जाहीर होईल.
विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करायला हवे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑनलाइन मूल्यांकन पद्धतीची सुरुवात करण्यात येत आहे.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यामापन मंडळ
फडणवीसांच्या इशाऱ्यामुळे हालचाल
सत्र परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होऊन, आगामी शैक्षणिक वर्ष निर्धारित तारखेला सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात, याबाबत विद्यापीठाने कोणतीही कार्यवाही न केल्यास सिनेट सदस्यांसह उपोषणाला बसू, असा धमकीवजा इशारा सिनेट सदस्य आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजित फडणवीस यांनी सोमवारी दिला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले आणि परीक्षेच्या नियोजनाला सुरुवात केली, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.