तिथी प्रारंभ आणि समाप्ती
पंचांगानुसार ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. वास्तविक, चैत्र पौर्णिमा बुधवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ९.१९ वाजता सुरू होईल आणि ती गुरुवार, ६ एप्रिल रोजी १० वाजून ५ मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीच्या मान्यतेनुसार ६ एप्रिललाच हनुमान जयंती साजरी केली जाईल आणि या दिवशी उपवास करून बजरंगबलीची पूजा केली जाईल.
शुभ मुहूर्त आणि शुभ योग नक्षत्र
६ एप्रिल रोजी सकाळी ६.०६ ते ७.४० पर्यंत हनुमान जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर तुम्ही दुपारी १२:२४ ते १:५८ पर्यंत पूजा करू शकता. याशिवाय संध्याकाळी ५.३० ते ८.३० हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे. सर्वार्थ सिद्धी योगात हनुमान जयंती सुरू होईल. यासोबतच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग असेल आणि यादिवशी भौतिक सुखांचा स्वामी शुक्र देखील आपली राशी बदलेल.
हनुमान जयंती पूजाविधी
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे नित्यकर्म उरकून घ्यावीत. हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन करावयाची जागा स्वच्छ करून घ्यावी. हनुमानाची मूर्ती वा प्रतिमा स्थापन करावी. हनुमान पूजनाचा संकल्प करावा. हनुमानाचे आवाहन करावे. आवाहन करताना हनुमान, श्रीराम आणि सीता मातेचे स्मरण करावे. पूजाविधी करताना ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. सुरुवातीला गणपती पूजन करावे. यानंतर हनुमानाला पंचामृत स्नान घालून अभिषेक करावा. यानंतर शुद्धोदक स्नान घालावे. हनुमान स्तोस्त्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, रामस्तुती यांचे यथाशक्ती पठण करावे. चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. पूजाविधी करताना हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अवश्य अर्पण करावे. यानंतर हनुमानाची आरती करावी. हनुमानाचे नामस्मरण करून पूजेची सांगता करावी. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून संकल्प पूर्ण करावा.
हनुमान जयंतीचे महत्व
हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी बजरंग बली पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतो आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करतो. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांती प्राप्त होते. यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते.