डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपीचा प्रकार समोर आला. पेपरचा वेळ संपल्यानंतर पुन्हा पेपर सोडविण्याची देण्याचा प्रकार शेंद्र्यातील परीक्षा केंद्रावर घडला. संबंधित परीक्षा केंद्रावरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर विद्यापीठ प्रशासनाला खडबडून जाग आली असून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील गोंधळ पहिल्या दिवशीपासून चव्हाट्यावर आला. यातच शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार समोर आला. पेपरची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी देण्यात येतो.
परीक्षार्थी मुलीने हा प्रकार समोर आणला. त्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेपर सोडविल्यानंतर पैसे घेऊन पुन्हा पेपर सोडविण्यासाठी देण्यात येतो, अशी चर्चा ऑडिओमध्ये आहे. या सेंटरवर फॉरेन्सिक सायन्स व सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. एका बाकावर दोन, तीन विद्यार्थी बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका चुकीची येणे, परस्पर परीक्षा केंद्र बदल अशा प्रकरणांनी पदवी परीक्षा गाजते आहे. त्यातच हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे.
यानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समिती बुधवारी भेट देणार असल्याचे सांगण्यात येते.
कुलगुरू काय म्हणाले…
पदवीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचे समितीच्या अहवालानंतर सलग्निकरण रद्द करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कळविले आहे. शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सोमवारी पीपल्स फॉरेन्सिक सायन्स व सायबर सिक्युरिटी महाविद्यालयाचे विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. या केंद्रावर पेपरची वेळ संपल्यावरदेखील विद्यार्थ्यांना बोलावून पेपर सोडविण्यात आल्याची तक्रार आली आहे. अशा प्रकारच्या केंद्रांमुळे शिक्षणक्षेत्राची बदनामी होत आहे.
समितीच्या अहवालानंतर महाविद्यालयाचे केंद्र रद्द करणे, वेळप्रसंगी संलग्निकरण काढून घेणे अशी गंभीर पावले उचलण्यात येतील. दळवी महाविद्यालय तसेच डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय (नवखंडा) या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन प्राध्यापकांचे बैठे पथक बुधवारपासून देण्यात आले आहे. हे पथक विद्यापीठातील प्राध्यापकांचे असणार असून पेपर सुरू होण्यापूर्वीपासून ते उत्तरपत्रिका सील करेपर्यंत केंद्रावरच ते बसून राहणार आहेत.