नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात १५ कोटी ८१ लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी चांगली तरतूद होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध घटकातील इयत्ता पहिली ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२१-२२ साठी ३४ हजार १९९, २०२२-२३ या वर्षासाठी ३७ हजार १६५ अर्ज आले आहेत. दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी ३३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात २०२१-२२ या वर्षासाठी प्राप्त ३४ हजार १९९ अर्जांपैकी २० हजार ४७ विद्यार्थ्यांचे अर्ज संमत करण्यात आले आहेत. त्यांच्या बँकेच्या खात्यात १५ कोटी ८१ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम हस्तांतरित करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. तसेच ७७ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत.
तातडीने दुरुस्ती करावी
अर्ज केलेल्यांपैकी १४ हजार १११ विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांना एसएमएसद्वारेही कळवण्यात आले आहे. अर्जदुरुस्तीनंतर पडताळणीत जे अर्ज संमत होतील, त्या विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करता येईल.
यासाठी संबंधित विद्यार्थी किंवा पालक यांनी या अर्जातील दुरुस्ती तातडीने करावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणीही चालू करण्यात आली आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.