शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना येत्या १३ एप्रिलपासून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, शाळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे. पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर १२ एप्रिलपासून प्रवेशाचे मेसेज पाठविण्यात येणार आहे.
राज्यातून पुण्यातील पोदार इंटरनॅशल स्कूलमधील ७२ जागांसाठी तीन हजार ६०८ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यामुळे या शाळेची लॉटरी काढण्यात आली.
यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी, एससीईआरटीचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, योजना विभागाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायमविनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागे उद्देश आहे.
यंदा ‘आरटीई’अंतर्गत राज्यातील आठ हजार ८२८ शाळांतील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी सुमारे तीन लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुण्यातून १५ हजार ६५५ जागांसाठी सर्वाधिक ७७ हजार ५३१ जणांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल नागपूरमधून ३६ हजार ४९० जणांनी अर्ज भरले आहेत, तर मुंबईतील ६ हजार ५६९ जागांसाठी १८ हजार २०७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
एकूण अर्ज ३६४३९०
शाळा ८८२८
प्रवेश क्षमता १०१९६९