हायलाइट्स:
- ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरातून २४ लाखांचा ऐवज लंपास.
- घरकाम करणाऱ्या महिलेने तिजोरीच चोरली
- पुणे शहरातील वानवडी परिसरातील घटना.
पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याकडे काम करणाऱ्या एका महिलिने कामावर आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी २४ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज तिजोरीसकट चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Crime Latest Breaking News )
वाचा:आरक्षणावर फडणवीसांची नवी भूमिका; म्हणाले, ‘तो संघर्ष टाळण्यासाठी…’
याबाबत ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार जयश्री नावाच्या महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांची पत्नी वानवडीतील बोराडेनगर परिसरातील गुलमोहर सोसायटीत राहतात. तक्रारदार हे परदेशात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात राहण्यास आले आहेत. नोकरीच्या निमित्ताने त्यांचा मुलगा दुबई येथे असतो तर, दोन मुली अमेरिकेत आहेत. तिसरी मुलगी कोंढव्यात असते. घरात पती-पत्नी दोघेच राहतात. वयस्कर असल्यामुळे घरकाम करण्यासाठी त्यांना एका महिलेची गरज होती. परिचयातील व्यक्तीने त्यांना एका महिलेचे नाव सूचवले. २७ जुलै रोजी ही महिला त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांना तिचे काम चांगले वाटले. त्यामुळे तिला कामावर ठेऊन घेतले. ओळख पुरावा म्हणून तक्रारदार यांच्या पत्नीने वारंवार तिच्याकडे आधारकार्ड मागितले होते. परंतु कामाच्या गडबडीत घरी विसरले आहे, असे सांगून अनेकदा वेळ मारून नेली. सुरुवातीचे दोन दिवस तिने व्यवस्थित काम केले. मात्र, ३० जुलै रोजी दुपारी चार वाजता ती काम करून निघून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवशी ती कामावर आली नाही. ज्या व्यक्तीने तिला त्यांच्याकडे कामासाठी पाठवले होते, त्यांच्याकडे चौकशी केली. पण, त्यांनी देखील तिचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक नसल्याचे सांगितले.
वाचा:राज्यात करोनाचा ग्राफ घसरला; हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज फक्त २ नवे रुग्ण
तक्रारदार यांच्या पत्नीला संशय आल्यामुळे त्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेली तिजोरी पाहिली. त्यावेळी त्यांना तिजोरी जागेवर आढळून आली नाही. त्यांच्या चोरीला गेलेल्या तिजोरीला बायोमेट्रिक कुलूप आहे. तिजोरीत ५३२ ग्रॅम वजनाचे २४ लाख २३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ५५ हजार रुपये रोख, ५०० अमेरिकन डॉलर, चार हजार दुबई दिनार असे परदेशी चलन व १० हजार रुपयांची तिजोरी असा २४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घरात काम करताना तिने संपूर्ण वेळ मास्क वापरला असल्याने तक्रारदार यांनी तिचा चेहरा पाहिला नव्हता. तिजोरी उघडता न आल्याने तिने तिजोरीच चोरून नेली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
वाचा: मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं गटारी कनेक्शन!; पोलीस हैराण