Summer vacation: राज्यातील माध्यमिक शाळांना या तारखेपासून सुट्टी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील माध्यमिक शाळांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुढील २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील शाळा १२ जूनपासून सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते नववीचा; तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी अकरावीचा निकाल ३० एप्रिलपूर्वी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक शाळांच्या सुट्ट्यांबाबत; तसेच नवीन वर्षात शाळा सुरू करण्याबाबत आज, बुधवारी निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल.

पाटील यांनी पत्राद्वारे विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी; तसेच शिक्षण निरीक्षकांना दिलेल्या सूचनांनुसार मंगळवार, दोन मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल. अनेक शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपणार असल्या, तरी नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे जादा वर्ग एप्रिल महिन्यात घेण्यात येत आहेत.

बारावीचे जादा वर्गही होणार आहेत. या सुट्टीचा कालावधी रविवारी ११ जूनपर्यंत ग्राह्य धरावा. पुढील शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ सोमवारी १२ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा १२ जूनपासून शाळा सुरू होतील.

विदर्भात २६ जूनपासून शाळा

जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा २६ जून रोजी सुरू होतील. इयत्ता पहिली ते नववी; तसेच अकरावीचा निकाल ३० एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करण्यात यावा. हा निकाल त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. मात्र, तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. अशा प्रकारे शाळेच्या सुट्टीच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सूचना द्याव्यात, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव, नाताळात सुट्ट्या द्या

शाळांची उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याएवेजी गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांच्या वेळी सुट्टी घेता येईल. या सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने आवश्यक कार्यवाही करता येईल. याबाबत अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून आवश्यक सूचना देणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Source link

Career Newseducation newsMaharashtra schoolMaharashtra TimesschoolSchool Summer vacationsecondary schoolsSummer vacationमाध्यमिक शाळा
Comments (0)
Add Comment