नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेचे दुसरे सत्र आजपासून (६ एप्रिल) सुरू होत असून, १५ एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. शहरातील दोन केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, दररोज जवळपास १ हजार २०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘एनटीए’मार्फत जॉईंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईई) मेन व त्या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते. जेईई अॅडव्हान्समधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगसाठी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
‘एनटीए’मार्फत घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षचा पहिला टप्पा गेल्या महिन्यात झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून सुरू होणार आहे.
पुन्हा दोन सत्रांत परीक्षा
शहरातील फ्युचर टेक सोल्युशन्स व पीव्हीजी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ही परीक्षा होणार आहे. या दोन्ही केंद्रांवर मिळून दररोज १ हजार २०० विद्यार्थी परीक्षा देणार असून, आठवडाभरात १२ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन ‘एनटीए’मार्फत करण्यात आले आहे. करोना कालावधीत विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा देण्याची सुविधा चार सत्रांमध्ये देण्यात आली होती. परंतु, गेल्या वर्षापासून मात्र पुन्हा २ सत्रांत ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षा देता येणार आहे.
हे लक्षात असू द्या
– भारतातील ३३५ आणि बाहेरील १५ अशा एकूण ३५० शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन
– एकूण ९ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली
– या सत्रातील विद्यार्थ्यांना २ एप्रिलपासून त्यांच्या लॉगइनमध्ये हॉल तिकिटे उपलब्ध
– परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक ‘एनटीए’च्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले
– परीक्षेसंबंधी माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवरील माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन