Fee Hike: शाळेकडून पुस्तके, फीची अवाजवी वाढ झाल्याने पालक संतप्त

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

ऐरोली सेक्टर १९ येथील न्यू होरिझॉन पब्लिक स्कूल (एनएचपी) या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये केलेली पुस्तके, गणवेशाची दरवाढ आणि शालेय शुल्कवाढ अवाजवी असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी बुधवारी शाळा प्रशासनाचा विरोध करत निदर्शने केली. यावेळी पालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र रबाळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना रोखले. शाळा प्रशासनानेही प्रवेशद्वार बंद करून पालकांना भेटण्यास प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला.

शाळा प्रशासन दरवर्षी पुस्तके व गणवेश यात ठराविक वाढ करत असते. परंतु यावर्षी शाळेने केलेली पुस्तकांची दरवाढ, गणवेश दरवाढ, शालेय शुल्क वाढ व पुस्तके ठराविक विक्रेत्याकडूनच घेण्याची सक्ती करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हे सरकारी नियमांच्या विरोधात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पालकांनीही २७ मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्यासमोरही प्रश्न मांडले होते. तेव्हा शाळा प्रशासन व पालकांचे प्रतिनिधी यांमध्ये चर्चा झाली होती. २८ मार्च २०२३ रोजी शाळेला या सर्व बाबतीत पालकांशी संवाद साधून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

परंतु शाळा प्रशासनाने अद्याप पालकांना बोलावले नाही. त्यामुळे पालकांनी संतप्त होऊन शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या संदर्भात शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांना प्रवेशद्वारावरच अडवत काहीही बोलण्यास नकार दिला.

शाळा प्रशासनाकडून मनमानी शुल्कवाढ करण्यात येत आहे. दरवर्षी शाळा प्रशासन प्रकाशनसंस्था बदलत असल्यामुळे घरात दुसरा मुलगा असल्यास त्याला ती पुस्तके वापरता येत नाहीत. एनसीआरटीची पुस्तके एक हजार ते १२०० रुपयांना मिळतात. परंतु शाळा प्रशासन अन्य प्रकाशनाची पुस्तके घेण्यास सांगतात. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत.
– जयकुमार, पालक

करोनानंतर जवळपास सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. करोनामध्ये शाळा बंद असल्यामुळे शुल्कामध्ये कपात करण्यास सरकारने सांगितले होते. तरीही शाळा प्रशासनाने शुल्कवाढ कमी केलेली नाही. शाळा थकीत शुल्कावर दरदिवशी १०० रुपये आकारणी करत आहे. त्यामुळे काही पालकांना दंडापोटी ११ ते १२ हजार रुपये भरण्याचे सूचित करण्यात आले आहे.
– स्मिता चिपळूणकर, पालक

Source link

exorbitant increasefee hikeMaharashtra TimesNew Mumbai Schoolschool fees booksSchool Parents angryपालक संतप्तशाळेकडून फी वाढ
Comments (0)
Add Comment