बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियामध्ये ५ एप्रिलला लॉटरी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना दोन दिवसांनी मिळणार असून, पालकांनाही दोन दिवसांनी याबाबत एसएमएस मिळणार आहेत.
राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला शाळा नोंदणी आणि त्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. २३ मार्चअखेर या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधून राज्यभरातील जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी लॉटरी प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.
ही प्रक्रिया संपण्यास अवधी लागणार असून, दोन दिवसांनी निवड यादीतील विद्यार्थ्यांची नावे जाहीर होणार आहेत. संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना याबाबत एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे.
– जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही दोन दिवसांनी ही यादी मिळेल. त्यांनतर प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू होणार
– नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ४०२ शाळा आरटीई प्रवेशांसाठी पात्र ठरल्या असून, या शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या ४ हजार ८५४ जागा उपलब्ध
– यासाठी नाशिक जिल्ह्यातून २२ हजार २१२ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ४ हजार ८५४ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार
– इतक्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीही जाहीर केली जाईल. निवड यादीतील प्रवेश निश्चितीनंतर उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रवेश पडताळणी समितीचा निर्णय महत्त्वाचा
निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या पडताळणी समितीने कागदपत्रे योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. योग्य कागदपत्रांअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे.