राज्य सीईटी सेलमार्फत एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ आणि २६ मार्च रोजी राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने सीईटी घेण्यात आली. राज्यातील १९१ केंद्रांवर ही सीईटी झाली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षेची यंत्रणाच बंद पडली होती. त्यामुळे एमबीए सीईटी पुन्हा एकदा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती.
पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत राज्य सीईटी सेलने चौकशी समिती नेमली होती. सीईटीच्या सर्व तक्रारींची शहानिशा करीत चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार एमबीएची पुन्हा एकदा सीईटी घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, विद्यार्थ्यांना ११ एप्रिलपर्यंत पुनर्परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांची परीक्षा २७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.