हायलाइट्स:
- फेसबूकवरून गंडवलं
- २५ कोटी देतो सांगून ५७ लाखाला लुटलं
- अशी फसवणूक तुमचीही होऊ शकते
अकोला : एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण अमेरिकन सैनिक असल्याचे भासवून २५ कोटी रुपयांचे आमिष दिले. त्यांच्या आमिषाला बळी पडल्यानंतर तब्बल ५७ लाख रुपये त्याच्या खात्यात पाठवल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे . या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला अटक केली असून त्याची सध्या चौकशी पोलीस करीत आहेत.
आत्माराम रामभाऊ शिंदे (वय ६८ रा. लहरीया नगर) हे आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ७ मे २०२१ रोजी त्यांच्या फेसबूकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्याशी एका व्यक्तीने संभाषण केले व आपण अमेरिकन सैनिक असून सध्या सिरीया बॉर्डरवर कर्तव्यावर असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, सिरियामध्ये काम करीत असताना त्याला एक बॉक्स सापडला. त्यामध्ये अमेरिकन डॉलर आहे. ते तिघांनी वाटून घेतले. व आपल्या हिश्यावर ३.५ मिलीयन डॉलर म्हणजे भारतीय चलन २५ कोटी रुपये एवढी रक्कम आली आहे.
आता ती रक्कम अमेरिकेत घेवून जावू शकत नाही. त्यामुळे त्या रकमेचे पार्सल तुमच्या नावावर इंडियात पाठवतो. त्यामधील तुम्हाला ३० टक्के रक्कम देईल व बाकीची मी घेवून जाईल. त्यानंतर त्याने विश्वास देवून आत्माराम शिंदे यांना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्र., ई-मेल, जवळील एअरपोर्ट याबाबत डिटेल माहिती मागितली. त्याने मागितलेली सर्व माहिती शिंदे यांनी त्याला दिली. त्यानंतर त्याने सांगितले की, एँन्थोनी नावाचा एजन्ट भारतात लँड करणार असून तो दिल्ली एअरपोर्टवरून नागपुर येथे बाँक्स घेवून येणार आहे.
तो तुम्हाला फोन करेल त्याने सांगीतल्या नुसार त्याचे सुचनेनुसार काम करा असेही सांगितले. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता अशोक नावाच्या व्यक्तीचा शिंदे यांना कॉल आला. त्याने दिल्ली एअरपोर्ट येथून बोलतो असे सांगून अँन्थोनी आलेला आहे. त्याला मराठी व हिंदी बोलता येत नाही व मी पुण्याचा आहे, असे मराठीत संभाषण केले. तुमचे पार्सल आलेले आहे. त्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगून सुरूवातीला ७४ हजार ९९९ रुपये लागतील असे म्हटले. त्याप्रमाणे शिंदे यांनी पैसे पाठवले.
यानंतर वारंवार तब्बल २२ वेळा शिंदे यांनी पैसे पाठवले. अशी एकूण ५६ लाख ६० हजार ९९८ रुपये रक्कम त्याचे खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतरही पैशाची मागणी सुरुच असल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी ती तक्रार सायबर क्राईमकडे वर्ग केली असता सायबर पोलिसांनी एका नायझेरीयन नागरिकाला संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे.
पैसे देण्यासाठी आत्माराम यांनी घरदार विकलं
आत्माराम शिंदे यांनी त्यांच्या कमाईतून विकत घेतलेले तीन प्लॉट विकले. त्यातून आलेली रक्कम त्यांनी एकापाठोपाठ २२ वेळा वेगवेगळ्या खात्यात पाठवली. एकूण ५६ लाख ६० हजार ९९८ रुपये रक्कम ऐवढी मोठी रक्कम त्यांनी पाठवली आहे.