देशभरातील बेरोजगार व औपचारिक शिक्षण न घेतलेल्या तरुणांचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत (रासेयो) हे सर्वेक्षण केले जाणार असून, त्याच्या अहवालानुसार या प्रकल्पाची पुढील दिशा ठरणार आहे.
बेरोजगार तरुण तसेच शिक्षण नसल्यामुळे कौशल्यांपासून वंचित राहिलेल्या तरुणांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ‘रासेयो’ संलग्नित महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दत्तक गावांमध्ये नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर या उपक्रमादरम्यान घेतले जातील. तसेच संबंधित गावांमधील औपचारिक शिक्षण न झालेल्या व नोकरीत नसलेल्या युवकांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. हे अर्ज केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाकडे जमा केले जाईल. काही वर्षांत वाढलेल्या बेरोजगारीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याची माहिती ‘रासेयो’ विभागामार्फत देण्यात आली.
नाशिकला गुरुवारी कार्यशाळा
हे सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचे यासाठी विद्यापीठामार्फत जिल्हानिहाय प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जाणार असून, नाशिकमध्ये १३ एप्रिल रोजी ‘मविप्र’ समाज संस्थेच्या केएसकेडब्लू कॉलेजमध्ये कार्यशाळा होणार आहे. नाशिक जिल्ह्याप्रमाणेच पुणे व नगर जिल्ह्यासाठी अनुक्रमे ११ व १२ एप्रिल रोजी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण कार्यशाळांमधील मार्गदर्शनानुसार नाशिक, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या ‘रासेयो’ विभागामार्फत देण्यात आली. यानुसार देशभरातील माहिती केंद्र सरकारकडे जमा झाल्यानंतर संबंधित बेरोजगार व औपचारिक शिक्षण न घेतलेल्या तरुणांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारमार्फत हाती घेण्यात आलेले हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाची ही सुरुवात आहे. विद्यापीठाच्या ‘रासेयो’ कार्यक्रम अधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रशिक्षण कार्यक्रमाला अनिवार्य आहे.
-डॉ. प्रभाकर देसाई, रासेयो संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ