अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभाची तिथी
भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजिला जातो, यंदा चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार १८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून, बुधवार १२ एप्रिल २०२३ पासून सर्व मठात आणि केंद्रात श्री स्वामी समर्थांच्या सेवेत सेवेकरी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ करतील.
यानिमीत्त काय काय सेवा करतात
शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजिले आहे. या सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतील.
प्रत्येक सेवेकऱ्याला आपला काही वेळ स्वामींसाठी, त्यांच्या भक्तीत लीन होण्यात समाधान मिळते. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती असते. शेवटच्या दिवशी महानैवेद्य व महाआरती नंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात येतो. पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.