विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती मिळणार एका क्लिकवर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी सुरू केली आहे. प्रवेशादरम्यान विद्यार्थी, पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रशासन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच संलग्न महाविद्यालये, अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता याची निश्चित करत आहे. प्राचार्यांना पत्र पाठवित अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता निश्चितीची प्रक्रिया सुरू केली. संलग्न महाविद्यालयांची संख्या ४५१ असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील शैक्षणिक वर्षात सुसूत्रता आणण्यासाठीचा प्रयत्न करत असून, याबाबत विद्यापीठाने समितीही नेमली. त्यांनी विद्यापीठ परिसर विभाग, उस्मानाबाद उपपरिसरातील विभागासह महाविद्यालयातील अभ्यासक्रमानिहाय प्रवेश क्षमता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी स्तरावरील प्रवेशाची लगबग सुरू होते; तर पदवी परीक्षेच्या निकालानंतर पदव्युत्तर महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया सुरू होते. मात्र, या प्रक्रियांचे निश्चित वेळापत्रक पाळले जात नाही. यंदापासून निश्चित वेळापत्रक पाळले जावे, यासाठी प्रशासन उपाययोजना करत असल्याचे सांगण्यात येते.

प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकापूर्वी एका क्लिकवर विद्यार्थी, पालकांना संलग्न सर्व महाविद्यालये, संबंधित महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि त्यांची प्रवेश क्षमता पाहता येणार आहे. त्या दृष्टिकोनातून पाऊले टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र, महाविद्यालयांची यादी पाठविली आहे. यादीचे अवलोकन करून अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता याबाबत लेखी स्वरूपात कळवावे लागणार आहे.

यासाठी १३ एप्रिलपर्यंत महाविद्यालयांना मुदत देण्यात आली आहे. यादीमध्ये विद्यापीठाने नॅक मूल्यांकनाची माहिती दिली आहे. यासह तपासणीनंतर अनेक महाविद्यालयांवर कारवाई करत विद्यापीठाने अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता कमी केली. यादीत त्यानुसार बदल केले असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

क्षमतेनुसार प्रवेश द्यावे लागणार

महाविद्यालयाच्या नावासमोर अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता देण्यात आली आहे. महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश द्यावे लागणार आहे. प्रवेश प्रक्रियाही निश्चित दिवसांमध्ये पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया, आराखडा तयार केला जात आहे. प्रवेश प्रक्रियेत अनेक महाविद्यालये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देतात. महाविद्यालयात पायाभूत, शैक्षणिक सुविधांचा अभाव असताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. प्रवेशा दरम्यानच अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता याची माहिती उपलब्ध असल्यास अनेक गैरप्रकार टाळता येतील, असे सांगण्यात येते.

Marathwada University: पदव्युत्तर अभ्याक्रमांची परीक्षा मेमध्ये
NEP: शालेय स्तरावर यंदापासून नवीन शैक्षणिक धोरण

Source link

Career NewsCollege Admissioneducation newsMaharashtra TimesMarathwada Universityप्रवेशाची माहिती एका क्लिकवरमराठवाडा विद्यापीठ
Comments (0)
Add Comment