त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील २४५ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांवर ‘बोलक्या भिंती’च्या रेखाटनाची जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई पालिकेचा शिक्षण विभाग हा नेहमीच आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या खर्चात वाढ आणि शिक्षण खात्यास मिळणारे अत्यल्प उत्पन्न यामुळे खर्च भागवण्यासाठी पालिकेला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. ३१ मार्च, २०२३पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शाळांसाठी असलेले अनुदान राज्य सरकारकडून अद्याप पालिकेला मिळालेले नाही.
शिक्षण खात्यास मिळणाऱ्या अत्यल्प उत्पन्नामुळे आर्थिक गणित जुळवण्याकरीता विविध पर्यायांचाही विचार करावा लागतो. त्यामुळेच पालिकेच्या शिक्षण विभागाकडून ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमासाठी यावेळी शिक्षक व मुख्याध्यापकांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
सध्या पालिकेच्या शाळांमध्ये सुमारे दहा हजार शिक्षक आहेत. २०२३-२४मध्ये मुंबई पालिकेने २४५ शाळांमध्ये ‘बोलक्या भिंती’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या शाळांसाठी उपक्रम राबवताना निविदा भरणाऱ्या बाह्य संस्थांनी यासाठी जादा खर्च दाखविला. पालिकेच्या शिक्षण विभागाला तेवढा खर्च परवडणारा नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बाह्य संस्थांमार्फत उपक्रम न राबवण्याचा सध्यातरी निर्णय घेतला आहे.
…तर विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेणार
पालिकेचा शिक्षण विभागाने असलेला पुरेसा निधी त्या-त्या शाळांस्तरावर उपलब्ध करून मुख्याध्यापक, शिक्षकांवरच बोलक्चा भिंतीच्या उपक्रमाची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कलागुणांना वाव तर मिळेलच शिवाय जादा निधीही खर्च होणार नाही. चित्रकला शिकवणारे शिक्षक किंवा ज्या शिक्षकांना या उपक्रमात भाग घेण्याची इच्छा असेल अशा शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही आवड असल्यास तेही यात सहभागी होऊ शकतात. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या शिक्षण विभागाची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय झाल्यास शिक्षणाबरोबरच ‘बोलक्या भिंती’ उपक्रमाची जबाबदारीही मुख्याध्यापक, शिक्षकांवर येणार आहे.
काय आहे, बोलक्या भिंती उपक्रम?
शाळेच्या वर्गातील तसेच शाळा हद्दीतील भिंती गणित, खगोलीय, भूगोल, इतिहास इत्यादी विषयांतील मुद्दे घेऊन रेखाटल्या जातात. यामधून विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयाची आवड निर्माण करणे आणि तो विषय सोप्प्या पद्धतीने समजावून सांगण्याचा शिक्षण विभागाच प्रयत्न असतो. शाळेत येता-जाता या विषयांच्या रेखाटलेल्या चित्रांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जाऊन आकर्षितही होतात.