हायलाइट्स:
- डेल्टा प्लस या करोना व्हेरिएंटने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- घाबरून न जाण्याचंही केलं आवाहन
जालना : राज्यात डेल्टा प्लस या करोना व्हेरिएंटने बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्यातील डेल्टा प्लस (Coronavirus Delta Plus Variant) रुग्णांची संख्या आता २१ वरून ४५ वर पोहोचली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
‘संबंधित रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिलेले असून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जाणार असल्याने कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही,’ असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई, रत्नागिरी, ठाणे, जळगाव आणि पुणे येथे रूग्णसंख्या जास्त आहे. तसंच मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला असल्याचं टोपेंनी सांगितलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुने घेतले जात असून प्रयोगशाळेत त्या नमुन्यांची जिनोमिक सिक्वेन्सीकच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान ही रुग्ण संख्या वाढल्याचे टोपे यांनी सांगितले.
डेल्टा प्लस रुग्णांची प्रवासाची पार्श्वभूमी तपासली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या राज्यातील करोना रुग्णसंख्या स्थिर असून दररोज साडेपाच हजारांपासून ७ ते८ हजारापर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ज्या जिल्ह्यात निर्बंध अजूनही कायम आहे तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
दरम्यान, एकीकडे आज रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल प्रवासातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. तसंच रेस्टॉरंट आणि मॉलबाबतचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.