सांताक्रूझ येथील सेंट मेरी हायस्कूल ही अनुदानित शाळा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून १३ हजार रुपयांची फी आकारत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असून, शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर शिक्षकांचा तुटवडा असल्याने अतिरिक्त शिक्षक नियुक्त करावे लागत आहे. हा खर्च भागविण्यासाठी शुल्काची आकारणी केली जात असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
कलिना येथील सेंट मेरी हायस्कूल ही अनुदानित शाळा आहे. अनुदानित शाळांना एका मर्यादेपलीकडे शुल्क आकारणीस परवानगी नाही. मात्र विद्यार्थी उपक्रमांच्या नावाखाली शाळेकडून तब्बल १३ हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. यामध्ये १२ हजार ८५० रुपये एवढे शुल्क उपक्रम फी म्हणून आकारले जात आहे. हे सर्व शुल्क शाळा प्रवेशावेळी जमा करण्यास पालकांना सांगण्यात आले आहे.
‘करोनाआधी दोन हजार रुपये फी होती. आता वाढवून ती १३ हजार रुपये केली आहे. याबाबत शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार केली आहे. तसेच अनेकदा चकरा मारल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही’, असा आरोप पालक गंगासागर शर्मा यांनी केला आहे.
‘सेंट मेरी हायस्कूलच्या अनुदानित शाळेत गरीब, कष्टकरी कुटुंबातील मुले शिकण्यास येतात. शाळेकडून उपक्रम शुल्काच्या नावाखाली मनमानी पद्धतीने मोठी रक्कम वसूल केली जात आहे. अनुदानित शाळांना केवळ १ हजार रुपये ते २ हजार रुपये शुल्क आकारण्याची परवानगी आहे. मात्र त्यांनी उपक्रम शुल्काच्या नावाखाली फी वाढवली आहे. तसेच सर्व फी शाळा सुरू होण्यापूर्वी भरण्यासाठी पालकांवर दबाव आणला जात आहे’, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते फैजान अजीज यांनी केला.
चौकशी करू : शिक्षण निरीक्षक
‘सरकारने कर्मचारी नियुक्तीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शाळेला स्वतःहून २५ ते २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली आहे. या शिक्षकांच्या पगाराचा खर्च शाळेलाच भागवावा लागतो. त्यामुळे फी घेतल्याशिवाय हा खर्च शक्य नाही’, अशी प्रतिक्रिया शाळेने दिली आहे. तसेच पालकांकडून फी थकविण्यात आल्याचा दावाही शाळेने केला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे विचारणा करताच पालकांच्या तक्रारींची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रीया शिक्षण निरीक्षक नवनाथ वनवे यांनी दिली.