लहानपणापासूनच वैमानिक बनवण्याची इच्छा असलेल्या रजत नगरीचा कपिल अवघ्या वीस वर्षांचा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचा पहिला तरुण वैमानिक म्हणून तो मायदेशी परतला आहे .आता भविष्यात एअर इंडियामध्ये सेवा करण्याची त्याची इच्छा आहे.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते अजयकुमार अग्रवाल यांचा कपिल हा एकुलता एक मुलगा आहे. कपिलने त्याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून एसएसडीव्हीमधून पूर्ण केले. त्यानंतर पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथून पूर्ण केले. तर अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील पाटकर कॉलेजमधून पूर्ण केले.
त्यानंतर २०२१ मध्ये त्याने वैमानिक बनण्याच्या स्वप्नाकडे धाव घेतली. पुढील शिक्षणासाठी कपिल अमेरिकेत गेला. अमेरिकेतील रोहिदास शहरातील ट्रेझल कोस्ट फ्लाईट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि वैमानिक बनण्याचे धडे घेऊ लागला. दीड वर्षांमध्ये २५० तास त्याने विमान चालण्याचे प्रशिक्षण घेतले.
जमिनीपासून दहा-हजार फूट उंचीपर्यंत विमान उडवणे हा आकाशातील प्रवास सुरुवातीला त्याला अत्यंत खडतर वाटत होता. पण चिकाटी आणि परिश्रम घेण्याची इच्छा असल्याने त्याने ते साध्य केले. २५० पैकी शंभर तास प्रशिक्षकाविना विमान लँड आणि टेकऑफ केले. त्यामुळे प्रशिक्षण घेताना बरेच काही शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.
२८ मार्च २०२३ मध्ये अमेरिकेत कपिलचे वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तसा कायमस्वरूपी परवाना त्याला मिळाला. काही परीक्षा देऊन हा परवाना देशात बदलून घेता येतो. भविष्यात एअर इंडिया सेवा करण्याची आपली इच्छा असल्याचे त्याने सांगितले.