हायलाइट्स:
- एसटीच्या चालकासह त्याच्या दोन साथीदारांकडून एसटीतील डिझेलची चोरी
- पोलिसांनी दोघांना केली अटक
- चोरी प्रकरणातील राजेंद्र शामराव धनवडे हा संशयित पसार
सांगली : पुणे-बंगळुरू महामार्गावर पेठ नाक्याजवळ मालवाहू एसटीच्या चालकासह त्याच्या दोन साथीदारांकडून एसटीतील डिझेलच्या चोरीचा प्रकार सुरू होता. रात्रगस्तीसाठी फिरणार्या इस्लामपूर पोलिसांच्या पथकाने डिझेल चोरांना रंगेहात पकडले. याप्रकरणी एसटी चालक नागेश रूपचंद्र धनवडे आणि त्याचा मित्र अमित श्रीकांत धनवडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या चोरी प्रकरणातील राजेंद्र शामराव धनवडे हा संशयित पसार आहे.
इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी चालक नागेश रूपचंद्र धनवडे हा इस्लामपूर एमआयडीसी येथून वाई एमआयडीसीत मालाची वाहतूक करणार होता. यासाठी वाहतुकीच्या एसटी क्रमांक एमएच ०७ सी ७०७९ वर त्याची ड्युटी होती. चालक नागेश धनवडे याने इस्लामपूर आगारातील पेट्रोल पंपातून एसटीची डिझेलची टाकी पूर्ण भरून घेतली होती. शनिवारी (ता. ७) रात्री साडेबाराच्या सुमारास तो इस्लामपूरहून मालवाहतूक करण्यासाठी एसटी घेवून बाहेर पडला.
पेठनाका येथील वाघवाडीकडे जाणार्या सर्व्हिस रोडवर एसटीचालक नागेश धनवडे याने एसटी थांबवली. त्यावेळी त्याचे मित्र अमित धनवडे व राजेंद्र धनवडे हे ह्युंडाई कार (एम.एच. ०४ ए.डब्लू. १२२५) घेवून थांबले होते. हे सर्वजण एसटीतील डिझेल एका पाईपने कारमध्ये ठेवलेल्या कॅनमध्ये काढत होते.
दरम्यान, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे रात्रगस्तीपथक त्या मार्गावरून जाताना पोलिसांनी एसटी थांबल्याचे पाहिले. पोलिसांनी पाहणी केली असता एसटीतून डिझेल चोरी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी धाव घेत एसटी चालक नागेश धनवडे व अमित धनवडे यांना ताब्यात घेतले. राजेंद्र धनवडे हा घटनास्थळावरून पळून गेला.
एसटीच्या डिझेल टाकीत १९० लिटर डिझेल असल्याने ५४२७ रूपयांचे ६० लिटर डिझेल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एसटी, ह्युंडाई कार, डिझेलचे कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद इस्लामपूर आगाराच्या सहायक वाहतूक अधीक्षक सुनंदा देसाई यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील करत आहेत.