Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: ऐतिहासिक धर्मांतर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला.

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात.

आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

Source link

dr. babasaheb ambedkardr. babasaheb ambedkar birth anniversaryDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहामानवशेतकरी
Comments (0)
Add Comment