‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यानुसार आगामी काळात शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बारावीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेची पद्धती बहुविद्याशाखीय शिक्षणाला अनुसरून तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला अजून सर्वसमावेशक करण्यासाठी ‘एनसीईआरटी’ने शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, अभ्यासक आदींकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.
आराखडा कसा तयार झाला?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतची रचना ५-३-३-४ अशी होणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शालेय शैक्षणिक आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती नेमली होती.
आराखड्यात ज्ञानविषयक दृष्टिकोन ठेवून अध्यापनात साधने, स्रोतांचा उपयोग, भाषा शिक्षण, आशय, तत्त्वज्ञानाचा आधार दिल्याचे नमूद केले आहे. आराखड्याचा मसुदा तयार करण्यापूर्वी जिल्हास्तरीय बैठका झाल्या. या बैठकींमध्ये मंत्रालय, धार्मिक गट, विविध संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यापीठांच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला. त्यानंतर मसुद्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.
शालेय शिक्षणाची विभागणी
नव्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार शालेय शिक्षणाची फाउंडेशन, प्रिपेरेटरी, मीडल, सेकंडरी स्टेज अशी विभागणी केली आहे. त्यानुसार फाउंडेशनमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसऱ्या वर्गापर्यंतचा समावेश आहे. प्रिपेरेटरीमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मिडल स्टेजमध्ये इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग राहणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांना महत्त्वाचा वाटणारा इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांचा समावेश सेकंडरी स्टेजमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील तरतुदीनुसार टप्प्याटप्प्याने मागणीनुसार परीक्षा पद्धतीकडे जाण्याबाबतही आराखड्यात सूतोवाच करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आधीच्या वर्षी शिकलेल्या संकल्पनांची उजळणी होण्यासाठी महिन्याभराचा ‘ब्रिज कोर्स’ घेण्यात येईल. असा प्रकारचा सराव, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आला.
नववी आणि दहावीच्या परीक्षा पद्धती
या आराखड्यानुसार सध्याच्या नववी आणि दहावीच्या परीक्षा पद्धतींमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मानव्यता, गणित आणि संगणन, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, समाजशास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखा या शाखांमध्ये विषय उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना दर वर्षी आठ या प्रमाणे दोन्ही वर्षांत १६ विषय पूर्ण करून उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. नववी आणि दहावीसाठी सध्याची परीक्षा पद्धत कायम ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, या दोन्ही परीक्षांना सेमिस्टर परीक्षा पद्धती तूर्तास लागू करता येणार नाही.
अकरावी, बारावीचा एकत्र निकाल
अकरावी आणि बारावीमध्ये विद्यार्थ्यांना मानव्यता, गणित आणि संगणन, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, समाजशास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखा या विद्याशाखांमधीन त्यांच्या आवडीनुसार तीन शाखांतील एकूण १६ विषयांची निवड करता येईल. नव्या आराखडय़ात वर्षांतून दोनदा सत्र पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन परीक्षांचा मिळून एकत्रित निकाल जाहीर केला जाईल. सातत्यपूर्ण मूल्यांकनाच्या निकषाद्वारे बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. अकरावी आणि बारावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा अशा तीन शाखांची पारंपरिक रचना मोडीत काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या परीक्षा पद्धतीनुसार अकरावी आणि बारावीची परीक्षा एकदाच घेतली जाते. त्यातही विद्यार्थी केवळ प्रवेश परीक्षांना अनुसरून अभ्यास करतात.
शालेय शिक्षणात बदल का?
– विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे.
– नावीन्यपूर्ण संशोधन आणि कल्पकतेला वाव देणे.
– वक्तृत्त्व आणि लिखाण शैलीत सुधारणा करणे.
– आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या बनवणे.
– मूल्यांचा आणि नीतिमत्तेचा विकास करणे.
– समस्या सोडविण्यासाठी आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी क्षमता विकसित करणे.
– संवेदनशीलता, कौशल्य, डिजिटल साक्षरतेचा विकास करणे.
– भारतीय पारंपरिक ज्ञानाची आणि चालू घडामोडींची माहिती होणे.