केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठीची भरती परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यात मराठी व कोकणीचाही समावेश आहे. एक जानेवारी, २०२४ पासून हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणला जाईल.
‘सीएपीएफ’मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची घोषणा गृह मंत्रालयाने शनिवारी ‘ट्वीट’द्वारे केली. ‘सीएपीएफ’ कॉन्स्टेबल (जीडी) भरतीच्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्येदेखील तयार केली जाईल. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय झाल्याचे गृह मंत्रालयाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामुळे या भाषा बोलल्या जाणाऱ्या राज्यांतील सरकारे स्थानिक तरुणांना मातृभाषेत परीक्षा देण्यासाठी या संधीचा उपयोग करून घेतील आणि मोठ्या संख्येने सेवेत करिअर करण्यासाठी मोठी मोहीम सुरू करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
‘सीएपीएफ’मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स (एआर) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) या निमलष्करी दलांचा समावेश होतो. या दलांमध्ये नजिकच्या काळात किमान ८४ हजार उमेदवारांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केंद्राने केली आहे. या भरतीची अधिसूचना केंद्र सरकार लवकरच काढणार आहे.
या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येईल, ज्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग या संदर्भातल्या एका करारावर लवकरच स्वाक्षरी करतील. कॉन्स्टेबलपदाची परीक्षा कर्मचारी निवड आयोगातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) घेतली जाणारी एक प्रमुख परीक्षा आहे. देशभरातून लाखो उमेदवार या परीक्षेस बसतात.
या भाषांमध्ये होणार परीक्षा
मराठी, कोकणी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलुगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी.