यातील १३३ जणांना उत्तरपत्रिका तपासणीबाबत; तर उपकेंद्रप्रमुख नेमल्यानंतर परीक्षा केंद्रावर हजर न राहणाऱ्या १४४ जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. मार्च-एप्रिल दरम्यान होत असलेल्या परीक्षेतही असहकार्य करणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येते.
विद्यापीठाच्या मागील सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल अद्याप जाहीर नाहीत. डिसेंबर-जानेवारीतील परीक्षांचे निकाल लांबले. मार्च-एप्रिल सत्र परीक्षा सुरू झाल्या; तरी निकाल नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे. उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक येत नसल्याने प्राचार्य, प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.
डिसेंबर-जानेवारीमध्ये पदव्युत्तरसह अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. तपासणीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली; परंतु तपासणीसाठी अनेक प्राध्यापक उपस्थित नसल्याने समोर आले. त्यानंतर अशा प्राध्यापकांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
परीक्षा विभागातील अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका तपासणीपासून दूर राहणाऱ्या १३३ प्राध्यापकांना नोटीस पाठविण्यात आली. त्यासह परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर उपकेंद्रप्रमुख नेमणूक झाल्यानंतरही अनेक जण उपस्थित राहिले नाहीत. अशांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते.
समिती समोर जावे लागणार
विद्यापीठाच्या ४८-५ समितीसमोर प्राध्यापकांना खुलासे सादर करावे लागणार आहे. परीक्षेत अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याच समितीसमोर आपले म्हणणे सादर करावे लागते. उत्तरपत्रिका तपासणी, परीक्षा दरम्यान अनुपस्थिती याबाबतही समिती कारवाईचा निर्णय घेईल, असे सांगण्यात येते. डिसेंबर-जानेवारीत २४४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर, उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यापीठाने पंधरा मूल्यांकन केंद्र निश्चित केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्राचार्यांचा प्रतिसाद कमी
मार्च-एप्रिलमधील परीक्षा व मूल्यमापनाच्या कामात टाळाटाळ, दिरंगाई करणारे संलग्नित महाविद्यालये, प्राचार्य व प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे संकेत विद्यापीठाने दिले. विद्यापीठाने प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. परंतु त्याला प्राचार्यांच प्रतिसाद कमी मिळाला. विद्यापीठाशी संलग्न ४५१ महाविद्यालयांपैकी १८२ महाविद्यालयांचे प्राचार्य बैठकीत सहभागी झाले. मार्च-एप्रिलच्या परीक्षा १३ एप्रिल रोजी संपल्या. परंतु अद्याप उत्तरपत्रिका तपासणीला गती नाही. त्यामुळे कुलगुरूंनी बैठक घेतली. पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी चार जिल्हयात मिळून २३ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा आहेत. बीड आठ, जालना पाच तर उस्मानाबाद येथील चार केंद्राचा समावेश आहे.
१३ एप्रिल- पदवी परीक्षा संपल्याचा दिवस
९ मे- पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्याचा दिवस
परीक्षा व मूल्याकंनात सहकार्य करणे, ही प्राचार्य, प्राध्यापकांची जबाबदारी आहे. या काळात टाळाटाळ केल्यास प्राध्यापकांची ‘मान्यता’ स्थगित करण्याचा विद्यापीठाचा अधिकार आहे. परीक्षा कामात टाळाटाळ, दिरंगाई करणाऱ्या संलग्नित महाविद्यालये, प्राचार्य व प्राध्यापकांवर वेळप्रसंगी कारवाई करण्यात येईल.
– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ