हायलाइट्स:
- येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल
- मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच भाजपकडून प्रतिक्रिया
- आमदार नीतेश राणे यांनी केलं खोचक ट्वीट
मुंबई: कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागिरकांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यामुळं मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी एक ट्वीट करत भाजपमुळंच हे झाल्याचा दावा केला आहे.
राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मागील आठवड्यात काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात आले होते. मुंबईतही दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या होत्या. मात्र, लोकल ट्रेन सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळं मुंबईकरांसाठी लॉकडाऊन सुरूच होते. त्याविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत चालली होती. भाजपनं याच मुद्द्यावरून मुंबई व ठाण्यातील रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन केलं होतं. ‘रेल्वे आमच्या हक्काची…’ म्हणत ती सुरू करण्यासाठी भाजपच्या नेते व आमदारांनी ‘रेल भरो’ केला होता. किमान दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल ट्रेन सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी भाजपनं केली होती. त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत घोषणा केली.
वाचा:लसीचा एक डोस घेतलेल्यांना लोकलमुभा का नाही?; मुंबईकरांचा सवाल
भाजपच्या आंदोलनामुळंच राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा आमदार नीतेश राणे यांनी ट्वीटमधून केला आहे. ‘ये लगा सिक्सर… लोकल ट्रेन १५ ऑगस्टपासून सुरू होणार! मुंबई भाजपचा हा मोठा विजय आहे,’ असं नीतेश राणे यांनी म्हटलंय. ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये,’ असं म्हणत भाजपनं सरकारला झुकवल्याचा चिमटाही त्यांनी काढला आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांना नीतेश यांनी टॅग केलं आहे.
वाचा: राहुल गांधींविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतून याचिका; काय आहे प्रकरण?