उच्च शिक्षणात ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’चा (भारतीय ज्ञान प्रणाली) समावेश करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एकूण ‘क्रेडिट’पैकी (श्रेयांक) किमान पाच टक्के ‘क्रेडिट’ ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’मधील अभ्यासक्रमांसाठी देण्यात येणार आहे. या मार्गदर्शक सूचनांवर ३० एप्रिलपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत
शिक्षण पद्धतीत ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ स्वीकारल्यामुळे त्यात पुढील संशोधन होईल आणि त्याचा समाजात वापर करता येऊ शकेल. या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार केल्यास प्राचीन भारतीय वारसा जपण्यास मदत होईल. दहा वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेवून या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार पाच वर्षांनी त्यात बदल करता येईल, असेही ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.
‘इंडियन नॉलेज सिस्टीम’चे अभ्यासक्रम साहित्य योग्य साधनांवर आधारित असेल, याची काळजी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पहिल्या वर्षी ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’मधील वैद्यकीय अभ्यासक्रमाशी संबंधित आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीची ओळख आदी ‘क्रेडिट’वर आधारित अभ्यासक्रम घेऊ शकतात.
त्याचप्रमाणे द्वितीय वर्षात भारतीय वैद्यक पद्धतीतील आयुर्वेद, सिद्ध, योग आदींचा दोन सत्रांचा थेअरी आणि प्रात्यक्षिकासाठीचा अभ्यासक्रम घेऊ शकतात, असेही ‘यूजीसी’च्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या विषयांचाही समावेश…
‘इंडियन नॉलेज सिस्टीम’मधील पायाभूत अभ्यासक्रमांमध्ये भारतीय सभ्यतेचे साहित्य, भारतीय स्थापत्य, भारतीय कला, भारतीय वस्त्र, भारतीय धातूकाम, भारतीय स्थापत्य आणि नगरनियोजन, भारतीय शिक्षण, संस्कृत आणि इतर भारतीय भाषांतील अभिजात साहित्य, भारतीय खगोलशास्त्र आदींचा समावेश आहे.
वैदिक काळ आधुनिक काळातील गणित या अंतर्गत वेद आणि शुल्भ सूत्रांतील गणित, पाणिनीचे अष्टाध्यायी, भास्कराचार्यांचे लीलावती आणि बीजगणित, आधुनिक भारतातील गणित असे विषय आहेत. त्याचप्रमाणे भारतीय खगोलशास्त्रातील विषयही देण्यात आल्याचे मसुद्यातून स्पष्ट होते.